राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप! संगमनेरातील सर्व सरकारी बँका बंद; सामान्य ग्राहक व निवृत्ती वेतनधारकांचे हाल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरु आहे. त्याच श्रृंखलेत आता सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असून देशभरातून त्याला कडाडून विरोध होवू लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी आजपासून दोन दिवसीय संप करीत आहेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंदोलकांनी मोर्चा न काढता श्री.ओंकारनाथ मालपाणी मार्गावरील स्टेट बँकेच्या शाखेबाहेर निदर्शने करीत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाने सरकारला जाग न आल्यास याहून तीव्र आंदोलन करण्याचा मनोदय यावेळी विविध वक्त्यांनी व्यक्त केला.


केंद्र सरकारने आपल्या अखत्यारितल्या विविध संस्था व कंपन्यांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. त्यात देशभरातील सरकारी बँकांचाही समावेश आहे. बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज 16 व उद्या 16 मार्चरोजी देशभरातील सरकारी बँकांच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी आज संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर येथील बँक कर्मचार्‍यांनी एकत्रित येत जोरदार आंदोलन पुकारले. यावेळी केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाला विरोध करीत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

आज सकाळी संगमनेर येथील श्री.ओंकारनाथ मालपाणी मार्गावरील स्टेट बँक शाखेच्या समोर सरकारी बँकांचे कर्मचारी एकत्रित झाले. त्यांनी हातात विविध घोषणा दिलेले फलक धरले होते. ‘जनतेचा पैसा, जनकल्याणासाठी’, ‘सार्वजनिक उद्योगांची विक्री थांबवा’, ‘सरकारी बँकांमध्ये नोकरभरती करा’, ‘बँकेतील कामाचे कंत्राटीकरण थांबवा’, ‘सरकारी बँकांचे खासगीकरण थांबवा’, ‘बँका वाचवा, देश वाचवा’ अशा घोषणा लिहिलेले फलक रस्त्यावरुन जाणार्‍या नागरिकांचे लक्ष्य वेधीत होते.

अखिल भारतीय बँक अधिकारी कौंसिलचे केंद्रीय समिती सदस्य सुधाकर जोशी यांनी यावेळी बोलतांना सरकारने बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द न केल्यास या पुढील काळात बेमुदत संपाचे हत्यार उपसणार असल्याचे सांगीतले. यावेळी हर्षद पाबळकर, वैभव कदम, अरविंद कचरे, सचिन कडलग, विजय डोंगरे, अनिरुद्ध मैड, महेश कात्रजकर, नितीन पांडे आदींसह विविध सरकारी बँकांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षद पाबळकर यांनी आजच्या आंदोलनाचे संचालन केले तर सुधाकर देशपांडे यांनी आभार मानले. उद्या (ता.16) सायंकाळी सात वाजता मेनबत्ती मोर्चा काढण्याची घोषणाही यावेळी आंदोलकांनी केली. या संपामुळे सामान्या नागरिकांचे हाल झाल्याचेही पहायला मिळाले.


दुसरा शनिवार आणि त्यानंतर रविवारी बँका बंद असल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिक व निवृत्तीवेतन धारक आज बँकेतील कामकाजासाठी शहरात आले होते. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी तत्पूर्वीच दोन दिवसीय संप जाहीर केलेला असल्याने ग्रामीणभागातून आलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना आणि निवृत्ती वेतन धारकांना माघारी परतावे लागले.

Visits: 12 Today: 1 Total: 114823

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *