संगमनेरच्या प्रवरा परिसरात बिबट्यांचा संचार..!


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिकारीच्या शोधात अनेक बिबट्यांनी नागरी वस्त्यांजवळ आश्रय घेतल्याचे दररोज समोर येत असताना आता शहरानजीकच्या काही उपनगरातही बिबट्यांच्या दर्शनाने तेथील नागरिकांची पाचावर धारणा बसली आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव एका वृत्तपत्र विक्रेत्याने घेतल्यानंतर ही बाब समोर आली असून संबंधीत विक्रेत्याने वृत्तपत्र टाकण्याच्या आपल्या वेळेतच बदल करुन घेतला आहे. बिबट्यांनी आता थेट शहरी वसाहतींजवळ ठाण मांडल्याने भल्या सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करणार्‍यांना मात्र दरदरुन घाम फुटला आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरालगतच्या घोडेकरमळा, प्रवरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एकाहून अधिक असलेल्या बिबट्यांनी दर्शन दिल्याची चर्चा सुरु होती. मात्र नागरी आणि समाज माध्यमात चालणार्‍या अशा चर्चांना विश्वासार्हतेचा आधार नसल्याने त्याबाबत कोणी फारसे गंभीर नव्हते. मात्र मंगळवारी या परिसरात वृत्तपत्र वितरीत करणार्‍या शहरातील एका विक्रेत्याला जेव्हा बिबट्याचे थेट दर्शन घडले तेव्हा मात्र बिबट्याच्या संचाराच्या वृत्ताने हा संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संबंधित वृत्तपत्र विक्रेता घोडेकर मळा परिसरात वृत्तपत्र टाकण्याचे काम करीत असतांना डाके फार्मच्या बाजूने आलेला बिबट्या त्याच्या दृष्टीस पडला. चक्क यमराजच आपल्यापासून काही अंतरावर असल्याचे पाहून त्याचा तर अक्षरशः थरथराट उडाला. त्या गदारोळात त्याने तेथून धूम ठोकीत थेट बसस्थानक गाठले. या प्रकाराची काल दिवसभर चर्चा सुरु होती. प्रवरा परिसरात दररोज पहाटे मोठ्या संख्येने नागरिक फिरायला जातात. अनेकजण अंधारातच या परिसरात जात असल्याने बिबट्यांचा संचार त्यांच्यासाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात वावरतांना अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली असून वन विभागानेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात तपासणी करुन पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.

 

Visits: 42 Today: 1 Total: 435459

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *