घरातच रंगली ‘ओली’ पार्टी नंतर केली घरफोडी! संगमनेरात चोरट्यांचा धुडगूस: चकन्यासाठी सुकामेवा आणि भोजनावरही मारला ताव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून जवळजवळ रोजच चोरी आणि घरफोडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता संगमनेर महाविद्यालया समोरील उच्चभ्रू वसाहतीतून चोरीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाचे घर हेरुन चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर एकत्रित बसून चोरट्यांनी ओली पार्टीही केली. त्यासाठी चकना म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेला सुकामेवा आणि फळांचाही आस्वाद घेतला. मद्यपान करुन तर्राट झालेल्या चोरट्यांनी घरातील खाद्यपदार्थ धुंडाळून भोजनही केले आणि त्यानंतर संपूर्ण घराची मनसोक्त उचकापाचक करीत दूरचित्रवाणी संच, लॅपटॉप, मल्टीस्क्रिन डिव्हाईससह दीड तोळ्यांचे दागिने आणि दहा हजारांची रोकड घेवून पहाटेच्या सुमारास तेथून पलायन केले. चोरीची ही अनोखी घटना वरकरणी अनोखी वाटत असली तरीही त्यातून चोरट्यांच्या मनात ‘पोलीस’ या शब्दाचा धाकच संपल्याचे सांगणारी ठरली आहे. याप्रकरणी तक्रारीतून काहीच साध्य होणार नसल्याचे सांगत संबंधितांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार बुधवारी (ता.३) पहाटेच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयाच्या समोरील घरकूल हौसिंग सोसायटीत घडला. वसाहतीत राहणारे शिक्षक आपल्या कुंटुबियांसह गावाला गेल्याने त्यांचे घर बंद होते. याची पूर्वकल्पना असल्याप्रमाणे चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. सदरील घराचा मालक रात्रीतून परतणार नसल्याची माहिती असल्याप्रमाणे चोरट्यांनी त्यानंतर आपल्याच बापाचे घर समजून यथेच्छ धुडगूस घातला. धक्कादायक म्हणजे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांनी सोबत मद्याच्या बाटल्याही नेल्या होत्या.

आत जाताच त्यांनी घरातील फ्रीजमधून थंडगार पाणी आणि तेथील ग्लास घेवून मनसोक्त दारु रिचवली. चकना म्हणून फ्रिजमध्ये ठेवलेला सुकामेवा, सफरचंद, पेरु आणि खजुरांवरही त्यांनी यथेच्छ ताव मारला. मद्यपानासाठी उंची चकना प्राप्त झाल्याने तृप्त झालेल्या चोरट्यांनी त्यानंतर स्वयंपाकघरात जावून खाद्यपदार्थ हुडकून काढीत भोजनाचाही आनंद घेतला. सर्व काही मनासारखे झाल्यानंतर या चोरट्यांनी फोडलेल्या बंगल्यातील प्रत्येक खोलीत जावून चीजवस्तूंची उचकापाचक केली. त्यातून कपाटात ठेवलेल्या दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रुपयांची रोकड त्यांच्या हाती लागली.


या व्यतिरीक्त घरात कोठेही किंमती ऐवज नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी आपले लक्ष्य बंगल्याच्या हॉलमध्ये केंद्रीत केले. हॉलमध्ये लावलेला भलामोठा ५३ इंचाचा दूरचित्रवाणी संच (टीव्ही) अगदी पद्धतशीरपणे भिंतीवरुन खोलून काढला, जवळच टेबलावर ठेवलेला लॅपटॉप आणि मल्टीस्क्रिन डिव्हाईस सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही चोरट्यांनी ताब्यात घेत रात्रभर घरात मनसोक्त धुडगूस घातला व नंतर तेथून पलायन केले. गुरुवारी सदरील शिक्षक घरी परतल्यानंतर चोरीचा हा अनोखा प्रकार समोर आला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांनाही कळविले.

शहर पोलिसांनी त्यांच्या घरी जावून पाहणी केली व पंचनाम्याचे सोपस्कारही पूर्ण केले. मात्र या सर्व प्रक्रियेनंतर त्यांनी तक्रार देवून काहीच साध्य होत नसल्याचे सांगत फिर्याद देण्यास नकार दिला. त्यामुळे जवळपास दोन लाख रुपयांच्या या अनोख्या घरफोडीनंतरही याबाबतची तक्रार दाखल झाली नाही. मात्र या जगावेगळ्या चोरीची चर्चा ज्याला समजली त्याने आपल्या पद्धतीने रंगवून अनेकांना सांगितली.


गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपनगरांमध्ये चोरट्यांचा अक्षरशः धुडगूस सुरु आहे. त्यातही बहुतेक प्रकरणात चोरट्यांकडून गावी गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेवून अशीच घरे लक्ष्य केली जात असल्याने उपनगरीय रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. उच्चभ्रु वसाहतीतल्या एका शिक्षकाच्या घरात चोरट्यांनी ओली पार्टी करण्यासह खाद्यपदार्थांवरही ताव मारल्याचे दिसून आले, त्याचवेळी सदरील घराच्या हॉलमध्ये खेळण्याचे पत्तेही विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने चोरट्यांनी घरात बसून जुगाराचे डावही रंगवल्याचे स्पष्ट आहे. यावरुन चोरट्यांच्या मनात पोलिसांविषयी कोणतीही भीती नसल्याचे ठळकपणे दिसून आले आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 29165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *