जाखडी यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा
जाखडी यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुरोहित प्रतिष्ठान तथा संगमनेर पुरोहित संघाचे संस्थापक अध्यक्ष भाऊ जाखडी यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. या निमित्ताने भविष्यात आणखी जोमाने वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करण्याचा संकल्प केल्याचे जाखडी यांनी सांगितले.

मागील अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो वृक्षांची लागवड विविध ठिकाणी करण्यात आली असून त्यासोबत नदी प्रदूषण विषयक जनजागृती, निर्माल्य संकलन, लोकहित यज्ञयाग, रक्तदान, हुतात्मा वीर जवान परिवारांना आर्थिक सहाय्य, गरजू विद्यार्थी दत्तक स्वीकार अभियान, अन्नदान, गुरुजन सन्मान, वृद्धाश्रमास व अनाथाश्रमास मदत, धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांना सर्वतोपरी मदत अशी विविध क्षेत्रात प्रतिष्ठान आपली सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडीत आहे. वाढदिवसानिमित्ताने मिळालेल्या शुभेच्छा या कार्याला बळ देणार्या आहेत असेही जाखडी म्हणाले. प्रवरा नदीतिरावर केशवतीर्थ परिसरात दोन पिंपळ आणि दोन लिंब वृक्षांचे रोपण जाखडी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, योगेश म्हाळस, सागर काळे, विशाल जाखडी, प्रतीक जोशी, बापू दाणी, रवी तिवारी, अशोक जाजडा, सुधीर सराफ, राजेंद्र वाकचौरे, सोमनाथ तापडे, शशीकांत मुळे, नंदू जाखडी आदी उपस्थित होते.

