साईचरणी भक्तांकडून सुमारे सोळा कोटी रुपयांचे दान शिर्डी महोत्सवानिमित्त आठ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन


नायक वृत्तसेवा, शिर्डी
सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या दरबारात दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साईचरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्यावतीने साईचरणी भरभरून दान करण्यात आले असून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईचरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टीत सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवानिमित्त २३ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक भक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.

हुलवळे म्हणाले की, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त २३ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ याकाळात आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत दानपेटीतून ७ कोटी ८० लाख ४४ हजार २६५ रुपये, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी ५३ लाख ८८ हजार ४७६ रुपये, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डीडी व मनी ऑर्डरद्वारे ४ कोटी २१ लाख ४० हजार ८९३ रुपये अशी एकूण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने ५८६.३७० ग्रॅम (रुपये ३२ लाख ४५ हजार २९५) व चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (रुपये ७ लाख ६७ हजार ३४६) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातून एकूण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.

तसेच या कालावधीत साईप्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजाराहून अधिक साईभक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११ लाख १० हजार ६०० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे १ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्त झालेले आहे. याबरोबरच ७ लाख ४६ हजार ४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.


दानाचा विनियोग…
साईबाबा संस्थानच्यावतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधांकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सांगितले.

Visits: 148 Today: 1 Total: 1425480

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *