जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सवाची जय्यत तयारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवर राहणार उपस्थित
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.७) दुपारी १ वाजता पुरस्कार वितरण व पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांसाठी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती महोत्सव समितीच्यावतीने जय्यत तयारी केली आहे.
संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सव समितीच्यावतीने प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रशस्त व्यासपीठ, जर्मन हँगर मंडप, साऊंड सिस्टीम, एलईडी व्यवस्था, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रशस्त वाहनतळ यांसह अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जावेद अली यांच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सर्व तयारी केली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जयंती महोत्सव असतो. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अत्यंत दर्जेदार व संस्मरणीय कार्यक्रम होत असून याही वर्षी जाणता राजा मैदानावर जयंती महोत्सव समितीच्यावतीने पुरस्कार वितरणासह स्थानिक कलाकारांचा आनंद सोहळा हा विविध गुणदर्शन कार्यक्रम, आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर तर जावेद अली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
या कार्यक्रमास मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांसह गायक उपस्थित राहणार आहेत. तसेच पुरस्काराने माजी आमदार उल्हास पवार, जळगावचा जैन उद्योग समूह व कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील यांना गौरवण्यात येणार आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे निरीक्षक रमेश चेन्नथला, एच. के. पाटील, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव, माजी आमदार डॉ सुधीर तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.