जिल्ह्यात बाराशे गुंड; पोलिसांनी आखला अॅक्शन प्लॅन
नायक वृत्तसेवा, नगर
विस्ताराने राज्यातील मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीपासूनच गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात आहे. अधूनमधून डोके वर काढणार्या या गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी पोलिसांनी काही योजना हाती घेतल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात 1209 गुंड, 536 हिस्ट्रीशीटर, 142 गुन्हेगारी टोळ्या, 4278 दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आरोपी अशा नोंदी अद्ययावत करण्यात आल्या असून त्यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई करून नजर ठेवण्यात येत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येत आहे. गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करीत असल्याचे आढळून आल्याने जानेवारी महिन्यापासून पोलिसांनी ‘टू प्लस’ ही योजना सुरू केली आहे. यामध्ये दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची माहिती वेगळी संकलित करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. 2011 पासूनचे असे 4278 आरोपी असल्याचे आढळून आले. त्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदविण्यात आली असून नवीन गुन्हे घडल्यावर ती पडताळून पाहणे शक्य होणार आहे. एका बाजूला या आरोपींविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू करताना त्यांचे मेळावे घेऊन मतपरिवर्तन करण्याचेही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली. या कामासाठी परिश्रम घेतलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, आर. डी. बारवकर, एस. एस. जोशी, ए. के. गोलवड, आर. व्ही. जाधव यांच्यासह संबंधित पोलिसांचा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.