हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन ‘नीलिमा’ बनली अधिकारी! रात्रंदिवस अभ्यास करुन दुय्यम निबंधक परीक्षेत मिळवले सुयश


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील नीलिमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत यश मिळविले आहे. कुठलाही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास करुन तिने वर्ग दोनचे सरकारी पद प्राप्त केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन या विद्यार्थिनीने यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण नानकर कुटुंब उघड्यावर पडले. अखेर मीनाक्षी नानकर यांनी आपल्या तिन्ही लेकींना घेऊन थेट कोपरगाव येथील माहेर गाठले. कर सल्लागार असलेल्या राजेंद्र काशिनाथ वरखेडे यांनी आपल्या बहिणीला आणि तिन्ही भाचींना मोठा आधार दिला. मात्र आपण कुणावरही अवलंबून राहायचं नाही, असा चंग मीनाक्षी नानकर यांनी बांधला. परिणामी शिवणकाम आणि स्वयंपाकाची कामे करुन त्यांनी तिन्ही लेकींना शिक्षणासाठी उद्युक्त केले. असंख्य अडचणी आल्या. पण नानकर कुटुंबियांनी हार मानली नाही.

मोठी कन्या शुभांगी हिने एम. कॉमचे शिक्षण घेतानाच अकाऊंटंट म्हणून नोकरी पत्करली. त्याचवेळी तिने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची (एमएसईबी) परीक्षा दिली. त्यात तिला यश आले. आज ती मुंबईत महावितरणमध्ये कार्यरत आहे. द्वितीय कन्या हेमांगी हिने सुद्धा एम. कॉमचे शिक्षण घेतले. तिनेही अकाऊंटटं म्हणून नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावला. त्यानंतर ती सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. आज ती पुण्यामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या दोन्ही लेकींचे लग्न करण्यापासून सर्वच प्रकारची जबाबदारी मीनाक्षी यांनी पार पाडली.

तर धाकली कन्या नीलिमा हिने एम. कॉमचे शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससीचा ध्यास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून तिने एमपीएससीच्या विविध परीक्षा दिल्या. आज दुय्यम निबंधक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ती उत्तीर्ण झाली आहे. नीलिमा ही एम. कॉमचे शिक्षण घेत होती. त्याचवेळी अकाऊंट विषय शिकविणारे प्रा. रवींद्र जाधव यांनी निलिमाला एमपीएससीच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तो नीलिमाने गांभिर्याने घेतला. मात्र, त्याविषयी तिला काहीही माहित नव्हते. अखेर तिने विविध पुस्तकांचे वाचन सुरू केले. त्यासाठी अभ्यासिका गाठली. विवाहित भगिनी शुभांगी आणि हेमांगी या दोघींनीही नीलिमाच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.

अखेर नीलिमाने पुण्यातील हडपसर गाठले. एमपीएससीचे कुठलेही क्लास न लावता हडपसरच्या महात्मा फुले अभ्यासिकेत सकाळी ७ ते रात्री ११ यावेळात प्रचंड अभ्यास केला. आणखी एका वाचनालयात ती रात्रभर अभ्यास करायची. याद्वारेच तिने एमपीएससीच्या विविध परीक्षा दिल्या. यातील एका परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मात्र, अन्य परीक्षांमध्येही उत्तम निकालाची तिला अपेक्षा आहे. दरम्यान नीलिमाच्या याच्याबद्दल तिच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Visits: 110 Today: 1 Total: 1108223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *