तिसऱ्या फेरीतही सत्यजीत तांबे यांची आघाडी कायम! मोठ्या फारकाने विजयाचा अंदाज; समर्थकांचा जल्लोश सुरु..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदार संघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेत विजयाचा शंखनाद करणार्‍या सत्यजीत तांबे यांनी दुसर्‍या आणि आता तिसऱ्या फेरीतही आपली आगेकूच कायम ठेवली आहे. अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झालेल्या माहितीनुसार तांबे यांनी पहिल्या दोन्ही फेऱ्यांप्रमाणेच तिसऱ्या फेरीतही 21 हजार मतांची आघाडी घेतली आहे. मतपेटीतून समोर येत असलेल्या आकडेवारीतून सत्यजीत तांबे यांना मतदारांनी पहिली पसंदी दिल्याचे स्पष्ट झाले असून आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे मानले जात आहे. पहिल्या फेरीतील आघाडीचे आकडे पाहूनच तांबे समर्थकांनी जागोजागी जल्लोश सुरु केला होता, त्यात आता भर पडली आहे.


सोमवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून विविध महसुली विभागांच्या मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून नाशिक पदवीधर मतदार संघ संपूर्ण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहीला. अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणणारा आणि अखेर सगळ्याच अंदाजांवर पाणी फेरणार्‍या या निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी राहीला असला तरीही मतदारांचा कल मात्र दिसून येत आहे.

पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना 7 हजार 922 मतांची आघाडी मिळाली होती. त्यातून त्यांची विजयाच्या दिशेने सुरु झालेली घोडदौड दुसर्‍या फेरीतही कायम असून त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यापेक्षा 21 हजार 251 मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे. पाच फेर्‍यांच्या या मोजणी प्रक्रियेतील सुमारे 25 हजार मतांच्या या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना 45 हजार 823 इतकी तर, महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 24 हजार 572 मते मिळाली आहेत. या फेरीतही बाद मतांची संख्या जवळपास सात हजारांच्या जवळ गेली आहे.


मतमोजणीतून समोर येत असलेल्या आकड्यांवरुन सत्यजीत तांबे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. अहमदनगरसह नाशिक, नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यासह गृह शहर असलेल्या संगमनेरातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोशही सुरु केला आहे. संगमनेर तालुक्यासह मतदार संघातील काही ठिकाणी आज सकाळीच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते. आता प्रत्यक्ष मतमोजणीतूनही तसेच चित्र दिसत असल्याने सत्यजीत तांबे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना असलेला विजयाचा विश्‍वासही आता ठळकपणे दिसू लागला आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 116393

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *