भंडारदर्‍यात थर्टी फर्स्टला पोलिसांचा कडक बंदोबस्त राजूर पोलीस व वन विभागाची बैठक; नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई


नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्याच्या निसर्गाचे कोंदण असलेल्या भंडारदरा येथे नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्‍या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा थर्टी फर्स्टला राजूर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

राजूर पोलीस व वन विभागाच्यावतीने भंडारदरा येथे नुकतीच बैठक पार पडली. भंडारदरा हे महत्वाचे निसर्ग पर्यटनस्थळ असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. यावर्षी सुद्धा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचा महापूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पर्यटकांच्या या गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी राजूरचे उपनिरीक्षक एफ. शेख व सहायक वनसंरक्षक अधिकारी अमोल आडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

भंडारदर्‍याचे कापडी तंबूचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण असून थर्टी फर्स्टसाठी सर्वात जास्त पसंती यासाठी मिळत असते. मात्र टेंटधारकांनी तंबूमध्ये वास्तव्यास येणार्‍या पर्यटकांची नोंद घेणे महत्वाचे असल्याने पर्यटकांचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांक या नियमांचे पालन न केल्यास कारवाई करणार आहे. टेंट परिसरात रात्री अकरा वाजेनंतर संगीत वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. रोजगार निर्मितीस प्राधान्य देत कॅम्पिंगसाठी नियमांत राहून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यटकास तंबूमध्ये वास्तव्यासाठी योग्य दर घेऊन प्रवेश द्यावा.

याचबरोबर राजूर पोलिसांकडून वारंघुशी फाटा, रंधा धबधबा, वाकी फाटा व राजूर येथे पर्यटकांसाठी तपासणी नाके उभारण्यात येणार असून मद्य व अंमली पदार्थ साठा आढळल्यास कायदेशीर कारवाई करून साठा जप्त करण्यात येणार आहे. वन विभागाच्यावतीनेही टेंटधारकांसाठी महत्वपूर्ण सूचना वन अधिकारी अमोल आडे यांनी दिल्या असून पर्यटकांसाठी शेकोटी करताना टेंटधारकांनी काळजी घ्यावी. पर्यटकांना रात्रीच्या वेळेस जंगलात फिरु देऊ नये, आदी नियमांचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दोन्ही विभागांनी दिला आहे.

भंडारदरा येथे थर्टी फर्स्टच्या रात्री पर्यटकांनी शांततेत नववर्षाचे स्वागत करावे, पर्यटनास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– प्रवीण दातरे (सहायक पोलीस निरीक्षक-राजूर)

Visits: 159 Today: 2 Total: 1105848

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *