शेंद्री कांद्याचे आगार मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत! कांद्यासह खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या
नायक वृत्तसेवा, घारगाव
रोहिणी नत्रक्ष सरल्यानंतरही वरुणराजाने अवकृपा केल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. सध्या मृग नक्षत्र सुरू होवूनही खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यामुळे शेंद्री कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पेरण्या खोळंबल्या असल्याचे दुर्दैवी चित्र पहावयास मिळत आहे.
पठारभागातील खरीप हंगामच महत्त्वाचा असतो. बाजरी, भुईमूग, वटाणा, कांदा आदी खरीपाची पिके घेतली जातात. यावरच येथील बळीराजाचा उदरनिर्वाह होत असतो. त्यातच सावरगाव घुले, जवळे बाळेश्वर, महालवाडी, पोखरी बाळेश्वर, ढोरवाडी, वरुडी पठार, तळेवाडी, पिंपळगाव देपा, कर्जुले पठार, डोळासणे, माळेगाव पठार, नांदूर पठार, मोरेवाडी, बावपठार हे शेंद्री कांद्याचे आगार म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात या कांद्याची पेरणी करतात. बाजारपेठेत या कांद्याला मोठी मागणी असल्याने वर्षभराचे उत्पन्नच या पिकातून मिळते. परंतु, यंदा रोहिणी नक्षत्र सरल्यानंतरही वरुणराजाने अवकृपा केल्याने कांद्यासह खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
गेल्या वर्षी अतिवृष्टीने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. वटाणा, कांदे व चारा पिके पाण्याखाली गेली होती. यामुळे कोरोनाच्या संकटात शेतकरी हवालदिल झाला होता. अद्यापही कोरोनाचे संकट सुरूच असून, बाजारपेठाही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मात्र, यावर्षी तरी भरघोस उत्पादन घेऊ अशा आशेवर असलेल्या बळीराजाकडे वरुणराजाने कानाडोळा केला आहे. भंडारदरा व मुळा पाणलोटात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार जरी होत असली तरी पठारभागात मात्र पावसाने डोळेझाक केल्याने शेतकर्यांवर चिंतेचे ढग साचले आहेत.