श्री कालभैरवनाथांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचीही सांगता
नायक वृत्तसेवा, नेवासा
तोफांच्या सलामीने पुष्पवृष्टी करत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नाथांच्या नावानं चांगभलच्या गजराने परिसर दुमदुमला होता. तर भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कोरोना महामारीमुळे यावर्षी मोजक्याच दहा भाविकांच्या उपस्थितीत श्री कालभैरवनाथांच्या जयंती निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव निमित्ताने रात्री 12 वाजता रामनाथ महाराज पवार यांचे श्री कालभैरवनाथांच्या जन्मावर कीर्तन झाले. त्यानंतर पुष्पवृष्टी करत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील महिला भाविकांनी श्री कालभैरवनाथ यांच्या जन्माचा पाळणा म्हंटला आणि शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
रात्री झालेल्या जन्मोत्सव प्रसंगी प्रवरा नदीच्या मध्य धारेवर असलेल्या श्री कालभैरवनाथांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मंगळवारी (ता.8) श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी जन्मोत्सव सोहळा काळात योगदान देणार्या भाविकांचा, ग्रामस्थांचा व सेवेकर्यांचा नामोल्लेख करत देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्त यांच्यावतीने आभार मानण्यात आले.