गुहामध्ये आमदार आझमींना दर्शवला तीव्र विरोध ग्रामस्थांच्या विरोधामुळे पोलिसांनी संगमनेरातच रोखले

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील गुहा गावात पुजार्यास व वारकर्यांस झालेल्या मारहाणी प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर सपाचे आमदार अबू आझमी येथील कुटुंबांच्या भेटीसाठी रविवारी (ता.१९) येणार होते. मात्र, गुहा येथील गावकर्यांनी एकत्र येऊन आझमी यांना गावात येणास तीव्र विरोध दर्शविला. आझमी यांना गावात प्रवेश करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकर्यांनी घेतल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गुहा येथे १३ नोव्हेंबरला सकाळी कानिफनाथ मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना काही समाजकंटकांनी येऊन वारकर्यांना भजन करण्यास मज्जाव करून पुजार्यांना मारहाण केली होती. यानंतर दोन समाजात चांगलीच हाणामारी झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सपाचे आमदार अबु आझमी हे रविवारी गुहा गावातील कुंटुबांना भेटण्यासाठी येणार असल्याचे गावकर्यांना समजताच गावातील जवळपास पाचशे ते सहाशे गावकर्यांनी तरुणांसह नगर-मनमाड महामार्गावरील वेशीजवळ हातात ‘आमदार अबू आझमी परत जा’ व घटनेच्या निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी करून त्यांना गावात येणास विरोध दर्शविला.

तत्पूर्वी आमदार अबू आझमी संगमनेर येथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून गुहा गावात जाण्यापासून रोखले व तेथूनच त्यांना विनंती करून माघारी धाडले व गावकर्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यामुळे गुहा गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गुहा येथे तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, आमदार आझमी गावात न आल्याने व पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील संघर्ष टळला.
