अन् आम्ही घरात घुसून पराभूत केले : डॉ.सुजय विखे पाटील

नायक वृत्तसेवा, आश्वी
गणेश कारखान्याच्या व लोकसभेच्या पराभवानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठे मताधिक्य देऊन ना. विखे पाटील यांना विधानसभेत पाठवले. शेजारच्या मतदारसंघातील नेते आपल्या मतदारसंघाची माहिती कामगारांच्या माध्यमातून गोळा करत बसले आणि आपण त्यांना घरात घुसून पराभूत केले, असा टोला डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी आ. बाळासाहेब थोरात यांना लगावला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे डॉ. विखे पाटील साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर होते. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे,  भगवान इलग, अशोक म्हसे, सरुनाथ उंबरकर, अशोक जऱ्हाड, ॲड. रोहीनी निघुते, रामभाऊ भुसाळ, सतिश जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील यांचे आशिर्वाद आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच कारखान्याची निवडणूक सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. सभासदांनी मनाचा मोठेपणा दाखवत फक्त २१ अर्ज दाखल करून संघटनेवर विश्वास ठेवला.२०२९ च्या विधानसभेपूर्वी निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट जागाही वंचित राहणार नाही. भोजापूर चारी आणि साकुर उपसा योजनेचे भूमिपूजन होईपर्यंत कोणताही सत्कार स्वीकारणार नसल्याचा पुनरुच्चार ही डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. तालुक्यातील खळी, पिंप्री-लौकी, अजमपूर, अंभोरे, पिंपरणे आणि घारगाव भागात लवकरच पाईपद्वारे निळवंडेचे पाणी पोहोचवले जाईल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना निम्या किंमतीत पशुखाद्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.शाळीग्राम होडगर म्हणाले, प्रामाणिकपणे काम केल्यास विखे पाटील कुटुंब त्याची दखल घेतं, याचे उदाहरण म्हणजे विजय म्हसे. आश्वी बुद्रुक येथील सामान्य घरातील विजय म्हसे यांना साखर कारखान्याच्या संचालकपदाची संधी मिळाली. विजय म्हसे यांनी खऱ्या नेत्याचे उदाहरण समाजासमोर ठेवलं.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांना खुर्चीच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शेवटी माणूस लाकडावरच झोपतो, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे फुलले. तसेच त्यांनी कार्यकत्यांच्या निष्ठेचे कौतुक करत, योग्य वेळी सन्मान आणि संधी मिळेल, अशी ग्वाही दिली.
Visits: 89 Today: 2 Total: 1106517

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *