राजकीय ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या आश्वीत नवा ‘पॉलिटिकल ड्रामा’! माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या स्वीय सहाय्यकाच्या शेतात बांधकाम साहित्याच्या पेट्या?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वी बुद्रुकमध्ये विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा धुव्वा उडवत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाने विजय मिळवला होता. ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होवून आता जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरीही त्यातून उठलेले राजकीय कंप मात्र अद्यापही जाणवत आहेत. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी (ता.१७) रात्री समोर आला असून विखे गटाच्या माजी सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरुन कामगार आयुक्तांनी चक्क माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहाय्यकांच्या शेतावर छापा घातला. त्यात बांधकाम कामगारांसाठी वापरल्या जाणार्‍या साहित्याच्या दहा पेट्या आढळल्या आहेत. त्यानुसार आश्वी बुद्रुक येथील विजय हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना थोरात गटाने मात्र हा सगळा प्रकार बनावट असल्याचा दावा केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज आश्वीतील व्यापारही बंद ठेवण्यात आला होता. एरव्ही विखे-थोरात गटासाठी राजकीय आखाडा मानल्या जाणार्‍या आश्वीत आता हा नवीनच ‘पॉलिटिकल ड्रामा’ रंगल्याने त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याचीही शक्यता आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये संगमनेर तालुक्यातील ‘राजकीय हॉटस्पॉट’ समजल्या जाणार्‍या आश्वी बुद्रुकमध्ये माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाने विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धोबीपछाड दिली होती. त्यानंतर काहीकाळ येथील वातावरण गंभीर बनल्यानंतर आता ते पूर्वपदावर आलेले असताना नवीनच राजकीय नाट्य समोर आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी थोरात गटाने मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी त्यांना वाटप करण्यासाठी बांधकाम साहित्याच्या किट मागवल्या होत्या. मात्र त्याची भणक लागल्याने विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ वाहनाचा पाठलाग केला असता ते अंधारात गायब झाल्याची जोरदार चर्चा आश्वी परिसरात सुरु होती.

निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर या सर्व गोष्टींच्या चर्चेची राळ खाली बसेल असे वाटत असतानाच आश्वी बुद्रुकचे माजी सरपंच हरीभाऊ ताजणे यांनी कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार करीत मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी थोरात गटाने बांधकाम साहित्याच्या पेट्या आणल्याचे व त्या थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजय हिंगे यांच्या शेतात लपवून ठेवल्याचा आरोप केला होता. त्या तक्रार अर्जावर कारवाई करताना कामगार आयुक्तांनी संगमनेरच्या तहसीलदारांकडे दोन सरकारी पंचांची मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी चिंचपूर व आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यांना पंच म्हणून नियुक्त केले. त्यानंतर कामगार आयुक्तांनी विजय हिंगे यांच्या घर व शेताची झाडाझडती घेतली असता शुक्रवारी (ता.१७) रात्री त्यांच्या ऊसाच्या शेतात बांधकाम कामगारांसाठी उपयोगात असलेल्या साहित्याच्या दहा पेट्या आढळल्याचा पंचनामा करण्यात आला व त्या पेट्या जप्त करुन आश्वी पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या.

या प्रकारानंतर आश्वी बुुद्रुकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. आज (ता.१८) ग्रामस्थांनी एकत्र येत हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचा दावा करीत विद्यमान महसूल मंत्र्यांच्या आदेशानेच हे कुभांड रचल्याचा आरोप केला. तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत आश्वीतील सर्व व्यवहार बंदही ठेवण्यात आले होते. याबाबत थोरात गटाच्यावतीने आश्वीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले असून त्यात माजी सरपंचाच्या तक्रारीवरुन कामगार आयुक्त व तलाठ्यांनी हा प्रकार घडवून आणल्याचा व तो सपशेल बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची १५ दिवसांत सखोल चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थ आमरण उपोषण करतील असा इशाराही देण्यात आला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी आश्वीच्या बाजारतळावर निषेध सभाही घेण्यात आली. यावेळी गावातील अनेकांनी सामाजिक कार्यकर्ते व माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजय हिंगे यांना बदनाम करण्यासाठी हे खोटे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप करुन रात्रीतून कोणीतरी अज्ञाताने सदरच्या पेट्या त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या शेतात आणून टाकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या दरम्यान माजी मंत्री, आमदार थोरात यांनीही आश्वी बुद्रुकमध्ये जावून ग्रामस्थ व हिंगे यांची भेट घेतली, मात्र त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.


विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रात येणार्‍या आश्वी खुर्द व बुद्रुकमध्ये विखे विरुद्ध थोरात हा राजकीय संघर्ष नेहमीच सुरु असतो, त्यामुळे या भागाकडे तालुक्याचा ‘राजकीय हॉटस्पॉट’ म्हणूनच पाहिले जाते. यावेळी मात्र थेट थोरात यांच्या स्वीय्य सहाय्यकालाच ‘लक्ष्य’ करण्यात आल्याने तालुक्यात आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Visits: 305 Today: 3 Total: 1107815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *