विचारांची पणती लावण्याचे काम ‘चपराक’ करतंय : डॉ. देखणे ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

नायक वृत्तसेवा, पुणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचारांची पणती लावण्याचे काम ‘चपराक’चा दिवाळी अंक करत आहे. दिवाळी अंकाच्या प्रकाशनाने दिवाळीची चाहूल लागते आणि ‘चपराक’चा दिवाळी अंक प्रकाशित झाल्यामुळे दिवाळीचा भास होतोय, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.

‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनानंतर अध्यक्षीय भाषणावेळी ते बोलत होते. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ, सुप्रसिद्ध कादंबरीकार उमेश सणस, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रसिद्ध स्तंभलेखक आणि पत्रकार सु. ल. खुटवड, उद्योजक विकास मुंदडा, कथाकार चंद्रलेखा बेलसरे आणि ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. देखणे म्हणाले, संत एकनाथ महाराजांची परंपरा चपराक चालवत आहे. चैतन्य राखणारे प्रकाशक म्हणजे घनश्याम पाटील आहेत. वास्तविक पाहता दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्याने वैश्विक साहित्याला दिलेली देणगी आहे. दिवाळी अंक म्हणजे वाङ्मयीन इंद्रधनुष्य असून तो रसिकांच्या क्षितीजावर उमलणारा आहे. दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याला आल्यानंतर पंढरपूरच्या वाळवंटात उभा असल्याचा भास होतो कारण दिवाळी अंकाद्वारे वैचारिकतेच्या सर्व दिंड्या या शब्दरुपी पांडुरंगाला भेटण्यासाठी येत असतात.

सुधीर गाडगीळ म्हणाले, नामवंत लेखकांची नामावली न लावता नवनव्या लेखकांचे लेख प्रकाशित करुन विक्रीचे सर्व विक्रम मोडणारा दिवाळी अंक म्हणजे ‘चपराक’चा दिवाळी अंक आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, दर्जेदार साहित्याचा अंक निर्मिती करणे हे चपराकचे यश आहे. मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले. आजच्या काळात ‘चपराक’ देखील ती परंपरा पार पाडतंय याचा मनस्वी आनंद आहे. संवाद आणि संघर्ष हा भविष्यकाळात परवलीचा शब्द होणार आहे. मात्र विचारांचा संघर्ष करण्याचे काम ‘चपराक’ने केले आहे. भविष्यातही ही परंपरा सुरू ठेवावी यासाठी शुभेच्छा. सगळीकडे संघर्ष, अस्वस्थता, नकारात्मकता असताना या अंधःकारमय काळात एक पणती टिकवून ठेवण्याचे काम चपराक करत असल्याचेही यावेळी केशव उपाध्ये म्हणाले.

उमेश सणस म्हणाले, दिवाळी अंकावर विविध ललनांचा फोटो छापून दिवाळी अंक विक्री करण्याचा प्रघात असताना ‘चपराक’ने मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र हे मुखपृष्ठावर छापून ही परंपरा मोडीत काढली आहे. मराठी माणसांच्या महत्त्वाच्या आवडी-निवडीत दिवाळीतील किल्ला, फराळ आणि दिवाळी अंक हे आहेत. दिवाळी अंकाची परंपरा केवळ मराठी साहित्यात आहे. एकीकडे लोकांना आवडते ते देऊन आपला गल्ला भरण्याचा जमाना असताना ‘चपराक प्रकाशन’ने मात्र समाजाला कशाची गरज आहे ते देण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गुणवत्तेची तडजोड न करणारा दिवाळी अंक म्हणजे चपराक होय, असे गौरवोद्गार यावेळी उमेश सणस यांनी काढले. त्याचबरोबर घनश्याम पाटील ही व्यक्ती राहिलेली नसून ती एक संस्था झालेली आहे. माय मराठी समृद्ध करण्यासाठी धडपड करणार्या ‘चपराक’च्या पाठिशी उभे राहणे गरजेचे असल्याचेही सणस म्हणाले.

सु. ल. खुटवड म्हणाले, ‘चपराक’च्या अंकात माझी कथा आहे आणि आज या प्रकाशनाला येईपर्यंत मला कथेवर अभिप्राय देणारे फोन महाराष्ट्रभरातून येत आहेत. लेखकांच्या लेखनाला असा सकारात्मक प्रतिसाद मिळणे हे प्रेरणादायी आहे. कामावरील निष्ठा, दिवाळी अंकावरील प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन आणि कोणताही व्यवसाय सचोटीने केल्यानंतर काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे चपराक आहे. मी जेव्हापासून लेखन करतोय तेव्हापासून पुस्तकांविषयी कायम नकारात्मक चर्चा ऐकत आलोय मात्र हे चित्र बदलण्याचं काम घनश्याम पाटील यांनी केलंय. चांगल्या व्यक्तीच्या पाठिशी उभे राहिल्यास आपल्यालाच त्याचा फायदा होतो. घनश्याम पाटील भूमिका घेऊन लढत असताना त्यांच्यासोबत उभे राहणे म्हणूनच हे आपले कर्तव्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गिर यांनी केले. सागर सुरवसे यांनी आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद येवले, अरूण कमळापूरकर, रवींद्र कामठे, विनोद पंचभाई, अंकुश देसाई आदिंनी परिश्रम घेतले.
