स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष! अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक; पक्षीय पातळीवर चाचपणीही सुरु..

नायक वृत्तसेवा, संगमनेर 

गेल्या सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का देत राज्यातील ४८ पैकी सर्वाधिक ३० जागा पटकावत विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी स्वबळावर सत्तेवर येईल असा दावा केला. मात्र प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत महायुतीने लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा विधानसभेत  काढत पद्धतशीरपणे महाविकास आघाडीच्या स्वप्नांवर पाणी फेरले. आणि स्वबळावर सत्ता स्थापन केली. या निवडणुकात अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल लागून प्रस्थापितांना घरी बसण्याची वेळ आली. त्याच बरोबर नवोदित उमेदवारांना थेट विधान भवनात बसण्याची संधी मिळाली. संगमनेर मतदार संघात काँग्रेसचे आठ टर्म आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले आणि नवख्या अमोल खताळ यांना जनतेने आमदार केले. या सर्व राजकीय घडामोडींचे पडसाद आता तालुक्यात दिसू लागले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले असून जो तो आपापल्या परीने विजयाचे आडाखे बांधत आहे. अनेक जण या निवडणुकात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून त्या पद्धतीने त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे.

विधान सभेपाठोपाठ मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही काळात होण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर शहरातील कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर प्रतिनिधित्व करता  यावे यासाठी आपापल्या पक्षांच्या आणि गटाच्या माध्यमातून आत्तापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.  संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट असून पंचायत समितीचे १८ गण आहेत. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील ९ पैकी ८ जिल्हा परिषद गटावर आणि १८ पैकी १५ पंचायत समिती गणांवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

आश्वी जिल्हा परिषद गटावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा सदस्य आहे. त्याचबरोबर आश्वी बुद्रुक आणि आश्वी खुर्द या दोन पंचायत समिती गणावर देखील त्यांचेच वर्चस्व अनेक वर्षापासून पाहायला मिळते. समनापुर जिल्हा परिषद गटातील समनापुर गणात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेच्या अशोक सातपुते यांनी बाजी मारली होती. त्यामुळे थोरात यांचे १५ सदस्य पंचायत समितीत होते. त्याचबरोबर संगमनेर नगरपालिकेत असणाऱ्या २७ नगरसेवकापैकी केवळ एक नगरसेवक विरोधकांचा होता आणि २६ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. परिणामी थोरात गटाची सत्ता नगरपालिकेवर होती. असं सर्व यापूर्वीचे चित्र असताना विधानसभा निवडणुकीनंतर मात्र तालुक्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अमोल खताळ यांच्या विजयाने माजी मंत्री थोरात गटाच्या चिंता वाढल्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक तरुणांनी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावेळी रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी देताना प्रस्थापित उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याची सल तरुण कार्यकर्त्यात आहे. त्यामुळे यंदा बाळासाहेब थोरात यांना या तीनही निवडणुकात भाकरी फिरवावी लागणार आहे. आमदार अमोल खताळ हे स्वतः तरुण असल्याने ते या निवडणुकात तरुणांना संधी देतील अशी अपेक्षा तरुण वर्गाला आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकात काट्याची टक्कर पाहायला मिळणार यात शंका नाही.

तालुक्यात परिवर्तन होऊ शकते हे अमोल खताळ यांच्या विजयाने दाखवून दिल्याचे प्रतिपादन महिनाभरापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोकणगाव येथील निझर्णेश्वर महादेवाच्या मंदिरात कार्यकर्त्यांशी हितगुज साधतांना केले होते. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा परिवर्तन करायचे या संकल्पनेने कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अमोल खताळ यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी भविष्यात तरुणांची गर्दी होऊ शकते हे नक्की.

विधानसभेच्या अनपेक्षित पराभवानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात गाफील राहणार नाहीत. त्यांच्याकडूनही नवोदित तरुणांना या निवडणुकात संधी मिळेल अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. त्याचबरोबर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या जागांवर आणि नगरपालिकेवर आपली सत्ता अभादीत ठेवण्यासाठी  रणनीती अखतील, यावेळी ते हलक्यात घेणार नाहीत, तर सत्ता टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. 

Visits: 51 Today: 1 Total: 255428

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *