पंधरा तासांच्या मिरवणुकीने गणेशोत्सवाची उत्साहात सांगता! महिलेच्या सतर्कतेने तरुण वाचला; बजरंग दल व एकविरा फौंडेशनची समर्पित सेवा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगमन झालेल्या गणरायाने दहा दिवसांतच संपूर्ण राज्याचा नूर पालटल्याने गुरुवारी अभूतपूर्व उत्साहाने आणि भक्तीभावाच्या वातावरणात बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली संगमनेरची मुख्य विसर्जन मिरवणूक मध्यरात्र उलटल्यानंतरही सुरु होती. रात्री एकच्या सुमारास तानाजी मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर १५ तास सुरु असलेल्या मिरवणुकीने संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली. या दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौकात विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला एक तरुण चिकटला होता, मात्र सुदैवाने हा प्रकार प्रेक्षक म्हणून पालिकेच्या परिसरात उपस्थित असलेल्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने प्रवाह खंडीत करुन जवळजवळ घडलेली दुर्घटना टळली आणि त्या तरुणाचा जीवही वाचला. विसर्जनादरम्यान कोणाताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता.२८) सकाळी साडेआठ वाजता माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिरीष वमने, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, उद्योजक मनीष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदी उपस्थित होते. यावेळी पालखीत विराजमान गणरायाच्या पालखी समोर पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. जवळपास तासभर चाललेल्या या सोहळ्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

दुपारी दोनच्या सुमारास रंगारगल्ली मंडळाचा मानाचा गणपती गवंडीपुर्‍यात आला. त्यानंतर दिवसभर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या या रस्त्यावर मानाच्या नऊ मंडळांसह एकूण १७ मंडळांनी सहभाग घेतला. मित्रप्रेम तरुण मंडळ (तेलीखुंट), श्री सत्कार समिती (गवंडीपुरा), शिवसेना शिंदेगट व भाजप (श्रीकृष्ण मंदिर), शिवसेना ठाकरे गट (मेनरोड), ओंकार ग्रुप (चावडी), साईनाथ युवक मंडळ, फ्रेंडस सर्कल मंडळ (मेनरोड), महात्मा फुले प्रतिष्ठान (माळीवाडा) व संगमनेर नगरपरिषद या ठिकाणी या सर्व गणपती मंडळांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकांमध्ये पोलिसांनी वारंवार डीजे वापरण्यास परवानगी नसल्याचे बजावले होते. मात्र त्या उपरांतही मिरवणुकीत सहभागी झालेल्या पाच मंडळांनी डिजेचा वापर केल्याचे दिसून आले.

त्यांच्या आवाजाची मर्यादाही तपासण्यात आली असून उद्यापपर्यंत कारवाईबाबत स्पष्टता नाही. याशिवाय अन्य मंडळांनी पारंपरिक पद्धतीचे ढोल-ताशा, बँड व झांज पथक, संबळ अशा वाद्यांनी मिरवणुकीतील रंगत वाढवली. गुरुवारी दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली होती. मात्र सलग आठ दिवस कोसळणार्‍या पावसानेही विघ्नहर्त्याच्या निरोप समारंभात पूर्णतः विश्रांती घेतल्याने तरुणाईचा उत्साह दुणावला होता. मुख्य विसर्जन मिरवणुकीत मानाच्या सोमेश्वर मंडळासह चौंडेश्वरी मंडळ, साळीवाडा मित्रमंडळ, राजस्थान युवक मंडळ, चंद्रशेखर चौक हिंदू मंडळ, नेहरु चौक मित्रमंडळ, माळीवाडा मित्रमंडळ, नवघर गल्ली मित्रमंडळ, स्वामी विवेकानंद मित्रमंडळ या गणरायांसह भारत चौक, बाजारपेठ व्यापारी मंडळ, क्रांतीवीर मंडळ (गणेशनगर), फेमस मित्रमंडळ, गणेशनगर मित्रमंडळ, देवीगल्ली तरुण मंडळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ (पावबाकी रोड) व तानाजी युवक मंडळ अशा एकूण सतरा मंडळांनी सहभाग घेतला होता. रात्री एकच्या सुमारास तानाजी मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर तब्बल १५ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, विठ्ठल पवार, माळी यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पावसाचे प्रमाण वाढल्यास निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जाण्याची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने थेट नदीपात्रात विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यातच भोजापूरच्या भिंतीवरुन ओव्हरफ्लो सुरु झाल्याने एव्हाना कोरडीठाक असलेली म्हाळुंगी नदीही दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाहती झाली. त्यामुळे रंगारगल्लीतून प्रवरापात्राकडे जाणारा कच्चापूल धोक्यात आल्याने प्रशासनाने तत्काळ त्यावरील वाहतूक थांबवली. त्यामुळे विसर्जनासाठी जाणार्‍या नागरीकांना कासारवाडी रस्त्याचा एकमेव पर्याय राहिला होता. त्याचा परिणाम गंगामाई परिसरात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी अनेकांना कासारवाडीकडील नदीपात्राकडे पाठवले. गुरुवारी काहींनी म्हाळुंगी नदीपात्रात तर काहींनी चिखलीजवळील आढळा पात्रातही श्रींचे विसर्जन केले. यासोबतच धांदरफळच्या रामेश्वर मंदिराजवळही नागरीकांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाचे आगमन होत असताना पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील एका किराणा दुकानावर लावलेल्या हॅलोजनमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. त्याला हात लागल्याने माडीवर एकटाच असलेला एक तरुण चिकटला. मात्र परिसरात मोठी गर्दी असूनही तो वरच्या भागात असल्याने त्याच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्याचवेळी पालिकेच्या प्रवेशद्वारालगतच बसलेल्या सारीका दावनपेल्ली या महिलेचे लक्ष त्याच्यावर गेले आणि त्यांनी तत्काळ आरडाओरड केल्याने काही जणांनी धावत जावून त्या ठिकाणी सुरु असलेला विद्युत प्रवाह खंडीत केल्याने जवळपास मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या ‘त्या’ तरुणाचा जीव बचावला. त्या महिलेच्या सतर्कतेबद्दल तहसीलदार धिरज मांजरे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. रात्री बारा वाजता पोलिसांनी वाद्य बंद केल्याने काहीकाळ मिरवणूक रेंगाळली होती. संपूर्ण विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

२०१९ साली तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी सुरु केलेला विसर्जनाचा ‘संगमनेर पॅटर्न’ यावर्षीही प्रशासनाने राबविला. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. नागरीकांना थेट पात्रात जावून विसर्जन करण्यास मनाई असल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात-जैन यांच्या एकविरा फौंडेशनच्या सदस्यांनी नदीकाठी गणेशमूर्ती ताब्यात घेत त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडे सोपविल्या. सालाबादप्रमाणे बजरंग दलाने मोठा तराफा तयार केला होता. त्यावर गटागटाने मूर्ती ठेवून त्यांचे पूजन केल्यानंतर प्रवाहात जावून त्यांचे विसर्जन केले गेले. बजरंग दल व एकविरा फौंडेशनच्या या समर्पित सेवेबद्दल संगमनेरकरांमधून त्यांचे कौतुकही होत आहे.

मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाची मिरवणूक सकाळी ९ वाजता सुरु झाली. सायंकाळी साडेसात वाजता हा गणपती पालिकेजवळ आला. त्यामुळे त्या पाठीमागे सहभागी झालेल्या मानाच्या आठ मंडळांसह एकूण १६ मंडळांच्या गणपतींना घाईघाईने आपली मिरवणूक पुढे घ्यावी लागली. दरवर्षी असेच घडत असल्याने मिरवणुकीतील निम्म्याहून अधिक गणेश मंडळांना मूकपणे बाप्पांना निरोप द्यावा लागतो. गुरुवारीही स्वामी विवेकानंद मंडळाचा नववा गणपती बारा वाजता पालिकेपासून पुढे सरकला आणि पोलिसांनी वाद्य बंद केल्याने उर्वरीत मंडळांनी नाराजी व्यक्त केली.

दरवर्षी मिरवणुकीत सर्वात शेवटी असणार्‍या तानाजी युवक मंडळाचा गणपती चावडीवर असतानाच रात्रीचे बारा वाजले होते. मात्र दरवर्षीचा अनुभव असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोबत टाळ आणले होते. पोलिसांनी वाद्य बंद केल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळाच्या नादात आणि टाळ्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक सुरु ठेवली, कार्यकर्त्यांचा हा पर्याय लक्षवेधी ठरला. रात्री एकच्या सुमारास या गणरायाचे विसर्जन होवून पंधरा तास चाललेल्या मिरवणुकीने संगमनेरच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *