काँग्रेस सरचिटणीस मापारींवर दुसर्‍यांदा हल्ला

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील लोणी खुर्द येथील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांच्या घरावर राजकीय वैमनस्यातून सोमवारी (ता.24) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणी पोलिसांत नऊ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोमवारी रात्री मापारी कुटुंबीय जेवण करता असताना शरद आहेर व योगेश आहेर हे शिवीगाळ करु लागले. याचा जाब विचारला असता त्यांनी श्रीकांत मापारी यांना ‘तु लय जिल्ह्याचे राजकारण करतो काय, तु सरचिटणीस झाला काय?’ असे बोलून शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलेशी गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलिसांनी शरद बाबासाहेब आहेर, योगेश अशोक आहेर, सुधाकर प्रभाकर आहेर, राहुल निवृत्ती घोगरे, धनंजय रघुवीर म्हस्के व इतर पाच ते सहा जणांविरोधात गुरनं.94/2021 भा.दं.वि. कलम 354, 323, 143, 147, 504 नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, दोनदा हल्ला झाल्याने काँग्रेस समर्थकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Visits: 97 Today: 2 Total: 1112669

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *