सत्तांतर होताच जिल्हा विभाजनाच्या मागणीला जोर! संगमनेर शिवसेनेचे महसूलमंत्र्यांना निवेदन; पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावून शिवसेना (शिंदे गट) व भाजपाचे सरकार स्थापन होताच अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय समोर येवू लागला आहे. गेल्या महिन्यात श्रीरामपूरच्या जिल्हा मागणी कृती समितीने या विषयाला हवा दिल्यानंतर आता शिवसेनेचे संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करीत आगामी पावसाळी अधिवेशनातच जिल्हा विभाजनाचा निर्णय घेवून उत्तर भागासाठी संगमनेर जिल्ह्याची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने बासनात गेलेला विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मुख्यालयाच्या मागणीवरुन पुन्हा एकदा संगमनेर विरुद्ध श्रीरामपूर असा सामना रंगण्याचे चित्र दिसू लागले आहे.

या विषयाला अनुसरुन शहरप्रमुख कतारी यांनी मंत्री विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तारलेला असल्याने जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला राहणार्या आदिवासी बांधवांना मुख्यालयाच्या ठिकाणी जावून प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक कामकाज करणे अतिशय खर्चिक व जिकरीचे बनले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नवीन संगमनेर जिल्ह्याची निर्मिती करणे आवश्यक झाले आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांची ही मागणी गेली अनेक वर्षांची असून संगमनेरात झालेल्या जिल्हा मागणी आंदोलनाला आपण स्वतः भेट देवून समर्थन दिल्याचा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिल्याचा दाखलाही कतारी यांनी या निवेदनातून दिला आहे.

आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनातच गेल्या अनेक वर्षांच्या या मागणीचा प्रस्ताव मंजूर करुन घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. संगमनेर, साकूर, घारगाव, राजूर, अकोले अशा सर्वच आदिवासी, डोंगरी, ग्रामीण भागातील नागरिक, पत्रकार व विद्यार्थ्यांनी नगर जिल्ह्याचा विस्तार आणि मुख्यालयाचे ठिकाण गैरसोयीचे असल्याने संगमनेरात मोठे आंदोलन उभे केले होते. मात्र गेल्या तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे बदलली मात्र या दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या पदरी निराशाच पडल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगर येथे आले असता विभाजनाबाबत त्यांच्याकडेही निवेदन देण्यात आल्याचे कतारी यांनी निवेदनातून सांगितले आहे. या मागणीचा राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व संगमनेर जिल्हा घोषीत करून संगमनेरकर व अकोलेकरांना न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, प्रथमेश बेलेकर, इम्तियाज शेख, दीपक वनम, विकास डमाळे, वेणुगोपाल लाहोटी, संभव लोढा, शीतल हासे, संगीता गायकवाड, सुरेखा गुंजाळ, आशा केदारी, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख अमोल डुकरे, अक्षय गाडे, अक्षय बिल्लाडे, वैभव अभंग, अजीज मोमीन, अनुप म्हाळस, दीपक साळुंखे, रंगनाथ फटांगरे, अमित फटांगरे, योगेश खेमनर, लक्ष्मण सोनार, रवी गिरी, नारायण पवार, राजू सातपुते, अशोक सातपुते, त्रिलोक कतारी, प्रशांत खजूरे, फिरोज कतारी, केवल कतारी, सागर भागवत आदिंच्या सह्या आहेत.

