आरक्षणावरुन आदिवासी समाज झाला आक्रमक! गुरुवारी अकोले तहसीलवर विविध मागण्यांसाठी मोर्चा


नायक वृत्तसेवा, अकोले
धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्याबाबत सरकार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज व संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचा जाहीर निषेध करण्यासाठी व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्या घेऊन गुरुवारी (ता.५) अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणानंतर धनगर समाजानेही आरक्षण मागणीची धार तीव्र केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्यातील आदिवासी बांधव, संघटना व आदिवासी आमदार देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यादृष्टीने याला विरोध करण्यासाठी मोर्चाची हाक देण्यात आली आहे.

अकोले तहसील कार्यालयावर गुरुवारी (ता.५) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाविकास आघाडी मित्रपक्ष आणि आदिवासी संघटनांच्यावतीने मोर्चा काढून सरकारला जाब विचारणार आहे. तसेच पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, अकोले तालुक्यातील कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद न करणे, कंत्राटी कर्मचारी धोरणाचा आदेश तत्काळ रद्द करणे, पेसा क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरणे, अनुसूचित जमातीचे खोटे प्रमाणपत्र मिळून भरती झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करुन तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करणे आदी मागण्या देखील करण्यात येणार आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 403699

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *