सासुरवाडीच्या लोकांकडून जावयाला रस्त्यात अडवून मारहाण राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल; जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू


नायक वृत्तसेवा, राहुरी
पती-पत्नीच्या वादातून सासुरवाडीच्या लोकांनी जावयाला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार केले. तसेच लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी फॅक्टरी परिसरात घडली आहे. या घटनेत जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुशांत इगनाती केदारी (वय ३३, रा. गुरुकुल वसाहत, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घरगुती वादातून पत्नी माहेरी राहत होती. तेव्हा वाद निर्माण होऊन सुशांत यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दिली होती. २६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सुशांत हे राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा नगर-मनमाड महामार्गावरून जात होते. तेव्हा तेथे त्यांचा सासरा, मेव्हुणा व इतर सहा ते सात लोकांनी येऊन त्यांना अडविले आणि म्हणाले की, तू आमच्या विरुद्ध संगमनेर येथे फिर्याद का दाखल केली, असे म्हणून सुशांत केदारी यांना शिवीगाळ करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. तसेच लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तू पुन्हा संगमनेर येथे दिसलास, तर तुला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली.

या घटनेत सुशांत केदारी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आरोपी सासरा श्याम माणिक लोखंडे, मेव्हुणा यश श्याम लोखंडे व इतर ५ असे एकूण ६ ते ७ जणांवर जबर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा राहुल पोलिसांनी दाखल केला आहे.

Visits: 148 Today: 1 Total: 1415943

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *