चंदनापुरी घाटात अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून! चौघे संशयित ताब्यात; ओळख पटल्यानंतरही पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नूतन महामार्गासाठी नव्याने घाटाची निर्मिती झाल्याने कधीकाळी प्रचंड वाहतुकीने गजबजलेला मात्र तरीही मनात धडकी भरवणारा चंदनापुरीचा जुना घाट मागील सहा वर्षांपासून अडगळीत गेला आहे. त्याचा गैरफायदा घेत निर्मनुष्य असलेल्या या भल्यामोठ्या परिसरात गुन्हेगारांचा वावर आणि त्यांचे वेगवेगळे गैरकृत्य वाढीस लागले असून त्यात आता खुनासारख्या गंभीर प्रकरणाचाही समावेश झाला आहे. रविवारी सायंकाळी जुन्या घाटातील पोलीस चौकीच्या समोरील बाजूस एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आलेल्या मयत मुलीची ओळख पटविण्यातही पोलिसांना यश आले आहे. मात्र सदरील मुलीच्या पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनाच त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल असा विश्वास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दैनिक नायकशी बोलताना व्यक्त केला आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना पाच ते सात दिवसांपूर्वी घडल्याचा संशय आहे. रविवारी (ता.२४) सायंकाळी चारच्या सुमारास या भागातून आपल्या वस्तीकडे जाणार्‍या एका शेतकर्‍याला जुन्या चंदनापुरी घाटातील पोलीस चौकीच्या समोरील गणेशाकृतीजवळ विवस्त्र अवस्थेत एका महिलेचा मृतदेह असल्याचे दिसले. त्यांनी जवळ जावून पाहिले असता सदरील महिला मुलगी असल्याचे व तिचा दगडाने डोके ठेचून खून झाल्याचे दिसल्यानंतर संबंधित इसमाने याबाबत तत्काळ तालुका पोलिसांना कळविले. त्यानुसार संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुका निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

यावेळी सदरील महिला अल्पवयीन मुलगी असल्याचे समोर आले. सदरील मुलीला कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी संगमनेरातून चंदनापुरी घाटात नेवून नंतर तिचा दगडाने डोके ठेचून खून झाल्याचेही निष्पन्न झाले. मारेकर्‍याने मुलीची ओळख पटू नये यासाठी अतिशय क्रूरपणे तिचा चेहरा ठेचून गुप्तांगावरही ज्वलनशील पदार्थ टाकल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी पंचनामा व घटनास्थळाच्या चित्रीकरणानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या शवविच्छेदनगृहात पाठवला. त्यातूनच सदरची घटना पाच ते सात दिवसांपूर्वी घडल्याचे स्पष्ट झाले.

खून झालेल्या मुलीचा चेहरा विद्रुप करण्यात आल्याने तिची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र अखेर रात्र होताहोता सदरील मुलगी मूळ राहाता तालुक्यातील ममदापूर येथील रहिवाशी असल्याचे व सध्या तिचे कुटुंब ज्ञानमाता विद्यालयाजवळ राहत असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी जावून सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याची विनंती केली. मात्र मृत मुलगी आमच्यासाठी कधीच मेल्याचे सांगत त्यांनी नकार दिला. मात्र पोलिसांनी कायदा समजावून सांगत तिच्या वडिलांना शवविच्छेदनगृहात नेवून मृतदेह पाहण्यास भाग पाडले. त्यांनी मयत मुलगी आपलीच असल्याचे ओळखल्यानंतर तिच्या सत्तरवर्षीय वडिलांना फिर्याद दाखल करण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार राजेंद्र फकिरा कदम (वय ७०, रा.ज्ञानमाता विद्यालयाजवळ) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी निर्मला राजेंद्र कदम (वय १५) हिचा खून केल्याप्रकरणी अज्ञात इसमांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२ (खून) व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम २०१ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्याकडे देण्यात आला असला तरीही संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरेही या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहेत. त्यातून त्यांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे, मात्र त्यातून अद्यापपर्यंत मुख्य मारेकर्‍यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग समोर आलेला नाही.

एकीकडे खुनाचा शोध सुरु करण्यात आलेला असताना दुसरीकडे मयत मुलीच्या वडिलांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला. उपअधीक्षक वाघचौरे यांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. सदर मुलीशी गेल्या काही वर्षांपासून आमच्या कुटुंबाचा कोणताही संबंध नसून तिच्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याची सल मयत मुलीच्या पित्याने बोलून दाखवली व अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनीच पुढाकार घेत मयतेवर अंत्यसंस्कार करण्याचा दुर्मिळ प्रकारही या घटनेच्या माध्यमातून संगमनेरात घडला. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्र जलदगतीने फिरवण्यास सुरुवात केली असून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज प्राप्त केले जात आहेत. याशिवाय चौघा संशयितांकडूनही धागेदोरे उलगडण्याची कवायत सुरु आहे, मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही. या घटनेने चंदनापुरी घाटातील गुन्हेगारी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.


नवीन महामार्ग सुरु झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून गाभणवाडीपासून गुंजाळ वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत असलेला वेड्यावाकड्या वळणाचा चंदनापुरी घाटरस्ता अडगळीत गेला आहे. या रस्त्यावरुन कोणत्याही प्रकारची वाहतूक होत नसल्याने निर्मनुष्य असलेल्या या घाटात आता गुन्हेगार, नशेबहाद्दर आणि अनैतिक देहव्यापार करणार्‍यांनी आपले बस्तान बांधले आहे. यापूर्वीही याच परिसरातून अनेकदा गुन्हेगारी प्रकार समोर आले आहेत. आतातर त्यात चक्क अल्पवयीन मुलीच्या खुनाचाही समावेश झाल्याने हा घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच परिसरात वैद्यकीय शिक्षण देणारे महाविद्यालय आणि विद्यार्थिनींचा मोठा वावर असल्याने भविष्यात पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी हा घाट कायमस्वरुपी बंदिस्त करण्याची कारवाई करावी अशी मागणी आता समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *