आज पासून पावसाचा वेग आणि व्याप्ती वाढणार : डख संगमनेर सह पश्चिम महाराष्ट्रात कोसळणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील वातावरणामध्ये लक्षणीय बदल होत असून येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक भागात पावसाने उशिरा हजेरी लावली होती, काही ठिकाणी केवळ हलक्याशा सरी कोसळल्या तर काही भाग अजूनही कोरडाच राहिला आहे. पण आता हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यात पावसाचा वेग आणि व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे संगमनेर सह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवार दि.१३ जून पासून बुधवार दि.१८ जून पर्यंत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१२ आणि १३ जूनच्या दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचे आगमन होईल. यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण चांगले असेल. हे पावसाचे प्रमाण दररोज भाग बदलत वाढणार असून, प्रत्येक जिल्ह्याला काही प्रमाणात नित्यनेमाने पावसाचा लाभ होईल.विशेष म्हणजे मराठवाडा भागातही पावसाचा जोर वाढणार आहे. बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत २० जूनपर्यंत दररोज पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस बहुधा मध्यम ते जोरदार स्वरूपाचे असतील. त्यामुळे या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण या पावसावरच खरीप पिकांची पेरणी आणि सुरुवात अवलंबून असते.

हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात १३ ते २० जून दरम्यान दररोज विविध भागांमध्ये पाऊस होणार आहे. यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून, खरीप हंगामाची योग्य सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, कृषी तज्ज्ञ आणि हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडी वाट बघण्याचा सल्ला दिला आहे.
Visits: 123 Today: 1 Total: 1101407

