पाचेगावमध्ये विद्यार्थ्यांना लोखंडी रॉडने मारहाण नेवासा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्धा गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पाचेगाव येथे बी. फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. लोखंडी रॉड, कुर्‍हाडीने तसेच कट्ट्याने मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत ज्ञानेश्वर बाबासाहेब दहिफळे (वय २२, रा.दैत्यनांदूर, ता.पाथर्डी) या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की पाचेगाव येथील शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बी. फार्मसीच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. माझ्यासोबतच सारंग दत्तात्रय कोळेकर (रा. मक्तापूर, ता. नेवासा) हा तसेच अभिजीत उंडे (रा. पाचेगाव) हा शिक्षण घेत आहे. माझे व अभिजीत उंडे याचे क्लासमध्ये भांडणे झाली होती. तेव्हापासून अभिजीत उंडे माझ्याकडे खुन्नसने पाहायचा. परंतु मी तक्रार दिली नव्हती.

सोमवारी (ता.२५) दुपारी एक वाजेच्या सुमारास सारंग कोळेकरसोबत मेसमध्ये जेवणासाठी जात असताना बाळासाहेब पवार यांच्या घराजवळ पाचेगाव येथे अचानक अभिजीत उंडे, तुषार पवार, अमित उंडे (पूर्ण नाव माहीत नाही सर्व रा.पाचेगाव) असे लाल रंगाच्या गाडीत आले व आम्हांला खुन्नस का देता? असे म्हणाले. आम्ही काही बोलण्याच्या अगोदरच तिघे त्यांच्या गाडीकडे गेले. गाडीतून अमित उंडे व अभिजीत उंडे लोखंडी रॉड व तुषार पवार कुर्‍हाड घेऊन आला. त्यानंतर पाठीवर, हातावर, मांडीवर, गुडघ्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. तुषार पवारने कुर्‍हाडीने उजव्या खांद्यावर व पाठीवर मारहाण करून जखमी केले. सारंग कोळेकर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला अमित उंडे याने रॉडने छातीवर मारहाण केली व तुषार पवार याने त्याच्या कमरेचा कट्टा काढून कट्ट्याच्या खालच्या बाजूने त्याच्या गालावर मारुन जखमी केले. त्यामुळे सारंग कोळेकर बेशुद्ध पडला. त्यानंतर सर्वजण शिवीगाळ करून तुम्ही आता वाचले अशी धमकी देऊन निघून गेले. यावरून नेवासा पोलीस ठाण्यात अभिजीत उंडे, तुषार पवार व अमित उंडे यांच्यावर गुरनं. ९५०/२०२३ भारतीय दंडविधान कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अ‍ॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 113206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *