निवेदिता सराफच्या अभिनयाने संगमनेरकर मंत्रमुग्ध! संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप; संगमनेरकर कलारसिकांचा उदंड प्रतिसाद


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारा माणूस सापडण्यासाठी भाग्य लागतं. असा माणूस प्रत्येकालाच भेटेल असेही नाही; आणि भेटलाच तर तो आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर भेटेल याचाही भरवसा नसतो. परंतु समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. त्यातील नात्यात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली तर ते तुटण्याचाही प्रश्न नसतो. असाच काहीसा संदेश देत रविवारी सादर झालेल्या ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप झाला.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या भन्नाट कौटुंबिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे, राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओंकार इंदाणी, कोषाध्यक्ष व्यंकटेश लाहोटी, उद्योजक प्रवीण पगार व ओम जाजू यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.

मंजू (निवेदिता सराफ) ही पन्नाशीतील विधवा स्त्री आपल्या कॉलेजमधील प्रियकर यशला (श्रीरंग देशमुख) आपल्या घरी बोलावते. त्याची बायको अन्नपूर्णा काही वर्षांपूर्वी वारलेली असते. मंजूला आयुष्याच्या या वळणावर अचानक पुन्हा यश भेटला. आजपर्यंत केवळ दुसर्‍यांसाठी राबणार्‍या मंजूला आता तरी यश बरोबर राहिलेलं आयुष्य जगायचं आहे. यश हा तसा भिडस्त, लोक काय म्हणतील याचा विचार करणारा, भित्रट स्वभावाचा असल्याने त्याकाळी मंजूचं आणि त्याचं लग्न होऊ शकलं नव्हतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. ते एकत्र येण्याकरीता योग्य असं वातावरण आता आहे. फक्त प्रश्न आहे तो स्वराचा (रश्मी अनपट), म्हणजेच मंजूच्या मुलीचा!

तिचं एक अयशस्वी प्रेम प्रकरण आणि त्यानंतर व्यसनी मंगेश बरोबरचं मोडलेलं लग्न यामुळे तिच्या मनात पुरुषांबद्दल कमालीचा अविश्वास निर्माण झालेला असतो. आपल्या भवितव्याबद्दल ती साशंकीत असते. मंजू आपल्या परीने तिला सावरायचा खूप प्रयत्न करते. तिनं पुन्हा आयुष्याला नव्याने सामोरे जावे म्हणून तिच्यासाठी धडपडते. स्वराच्या ऑफिसमधील कपिल (सुयश टिळक) हा तरुण तिला नकळत आवडू लागलाय की काय असं तिच्या बोलण्यातून मंजूला वाटते. पण स्वरा मात्र ते साफ कारते. त्यामागील कारणही तिच्या भूतकाळातील ‘त्या’ कटू आठवणीच असतात. यशलाही मंजूशी लग्न करायचं असतं. पण आधी स्वरानं आपल्याला मनापासून स्वीकारायला हवं असंही यशला वाटतं. पण थेटपणे तिला हे सांगण्याचे धाडस त्याच्यात नसते.

अशात मंजू कपिलला एकदा घरी बोलवून घेते आणि त्याच्या मनाचा थांग लावण्याचा प्रयत्न करते. तो एक चांगला मुलगा आहे हे तिला या भेटीत कळतं. त्याचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वत:बद्दलचं आकलन तिला आवडून जातं. पराभूत मनोवृत्तीनं जगणार्‍या स्वराला तो समजून घेऊ शकेल, तिला सुखी करू शकेल हे तिला जाणवतं. पण त्या दोघांना एकत्र आणायचं कसं?. सरतेशेवटी घाबरट असलेला यश आणि मंजू जसे होते तसेच अलिप्त राहतात. मात्र, स्वरा आणि कपिल एकमेकांसाठी उत्तम आहेत असे मानून लग्न करण्याचा निर्णय घेतात असा कौटुंबिक भन्नाट ड्रामा असलेल्या या नाट्यप्रयोगाने तब्बल दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचाही समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *