संगमनेर तालुक्यात कोविडने घेतले एकाच दिवशी दोघांचे बळी! शहरातील गिरीराजनगरमधील इसमासह तालुक्यातील चिखली येथील महिलेचा कोविड मृत्यु
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविडचा कहर सुरुच असून दररोज वाढत्या रुग्णसंख्येसोबतच तालुक्यातील कोविड मृत्युमध्येही वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सात जणांचे बळी घेणार्या कोविडने या महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच आपली दाहकता स्पष्ट केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी माळीवाड्यातील एकाचा बळी घेणार्या कोविडने नंतर तीन दिवसांत आणखी दोघांचे तर रविवारी शहरातील एकासह तालुक्यातील एका महिलेचा बळी घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोविड बळींची संख्या आता एकतीसवर जावून पोहोचली आहे.
गेल्या गुरुवारी (ता.3) शहरातील गिरीराजनगर परिसरात राहणार्या 59 वर्षीय इसमाचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या दरम्यानच रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला आहे. ही वार्ता ऐकून धक्का बसलेले संगमनेरकर त्यातून सावरत असतांनाच काही वेळातच दुसर्या अप्रिय वार्तेने संगमनेरकरांमध्ये दहशत निर्माण झाली.
शनिवारी तालुक्यातील चिखली येथील 76 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होवू लागल्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांचा स्त्राव घेवून तो खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. रविवारी त्याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच सदर महिलेचा मृत्यु झाल्याची वार्ता समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह चिखलीमध्ये एकच खळबळ उडाली. एकाच दिवशी दोघांचे बळी गेल्याने कोविडला सहजपणे घेणार्या संगमनेरकरांमध्ये त्यामुळे दहशत निर्माण झाली.
कोविडचा बळी ठरलेल्या शहरातील 59 वर्षीय इसमावर संगमनेरच्या स्मशानभूमित रात्री उशीराने तर चिखलीतील महिलेवर तेथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अग्निडाग देणार्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून अंत्यंविधीसाठी कोविड मृत्युसंदर्भात शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.
या महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी 42 रुग्णसंख्येसह 70 वर्षीय इसमाचा बळी घेणार्या कोविडने नंतरच्या चार दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 280 रुग्णांची भर घालण्यासोबतच एकुण पाच जणांचे बळी घेतल्याने संगमनेरकरांमध्ये कोविडविषयी दहशत निर्माण झाली आहे.
स्थानिक प्रशासनाच्या आकडेवारीनुसार संगमनेर तालुक्यात आजच्या स्थितीत 29 जणांचे बळी गेले आहेत. गेल्या 1 सप्टेंबररोजी मृत्यु झालेल्या शहरातील माळीवाडा येथील सत्तर वर्षीय इसमासह 3 सप्टेंबररोजी मृत्यु पावलेल्या मालदाड येथील 35 वर्षीय छायाचित्रकाराचा मृत्यु जिल्ह्याबाहेर झाल्याने तेथील प्रशासनाकडून त्यांचा मृत्यु अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आजच्या स्थितीत सरकारी आकडेवारीनुसार मयतांची संख्या 29 असली तरीही प्रत्यक्षात कोविडने अधिकृतपणे तालुक्यातील 31 जणांचे बळी घेतले आहेत.
जिल्ह्यातील 380 कोरोनाबाधित रुग्णांना आज जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यात अहमदनगर महापालिका हद्दितील 98, अहमदनगर ग्रामीण क्षेत्रातून 39, राहाता तालुक्यातील 34, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रत्येकी 32, संगमनेर तालुक्यातील 27, पारनेर तालुक्यातील 21, कर्जत तालुक्यातील 17, कोपरगाव तालुक्यातील 16, श्रीगोंदा तालुक्यातील 15, अहमदनगर लष्करी क्षेत्र व राहुरी तालुक्यातील प्रत्येकी 13, अकोले तालुक्यातील 10, पाथर्डी तालुक्यातील 8, जामखेड तालुक्यातील 3 व अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
- * जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या : 25 हजार 879
* आज डिस्चार्ज मिळालेले जिल्ह्यातील एकुण रुग्ण : 380
* चाजवर बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या : 22 हजार 150
* जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण : 85.59 टक्के
* आज नव्याने वाढलेले जिल्ह्यातील रुग्ण : 266
* जिल्ह्यातील सक्रीय संक्रमित रुग्णांची संख्या : 3 हजार 356
* जिल्ह्यात आजवर गेलेले कोविड बळी : 373
प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या : राजेश टोपे
कोविड संक्रमित होवून 28 दिवस झालेल्या 18 ते 60 वयोगटातील कोविड योद्ध्यांनी पुढे येवून प्लाझ्मा दान करावे. ज्या व्यक्तिला रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मृत्रपिंडाचे विकार अथवा हृदयविकारासारखे आजार नाहीत व त्यांनी कोविडचा पराभव करुन 28 दिवस झाले आहेत अशा व्यक्ति प्लाझ्मा दान करु शकतात. रक्तदानाप्रमाणेच प्लाझ्मादानाचे महत्त्व असून आपल्या दातृत्त्वातून एखाद्याचा जीव वाचेल, त्यासाठी पुढे या असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यात कोविडचा पराभव करुन पूर्णतः बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे.