ड्रोनच्या मदतीने वाळू तस्कारांची ओळख पटवून ‘मोक्कान्वये’ कारवाई! महसूलमंत्री विखे पाटलांची घोषणा; जोर्वेनाका घटनेतील आरोपींना सोडणार नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरात रविवारी घडलेल्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोषी असलेल्यांना कोणत्याही स्थितीत सोडणार नाही. या घटनेला काहीजणांकडून वेगळा रंग देण्याचाही प्रयत्न सुरु आहे. मात्र शहरातील सलोख्याचे वातावरण कायम राहीले पाहिजे ही आमची भूमिका आहे. रविवारच्या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरु असून अतिक्रमणं व त्यातून अवैध व्यवसाय या घटनेला कारणीभूत असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने पालिका व पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाळू तस्करीसाठी कालबाह्य वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता उपप्रादेशिक परिवहन विभागाला संगमनेरातील सर्व वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय यापुढे ड्रोनचा वापर करुन वाळू तस्करांची ओळख पटविली जाणार असून त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करणार असल्याची घोषणा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेरात केली.


राहाता विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या जोर्वे येथील आठ जणांना रविवारी रात्री जोर्वेनाका येथील 100 ते 150 जणांच्या जमावाने तलवारी, चॉपर, लोखंडी सळ्या व काठ्या-लाठ्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. त्याचे पडसाद आता संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागात उमटू लागले असून रहिमपूर व कोल्हेवाडी येथील ग्रामपंचायतींनी विशेष सभा बोलावून निषेधाचे ठराव केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही ग्रामपंचायतींनी जोर्वेनाका येथील रस्त्यावर बोकाळलेली अतिक्रमणे आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट याकडे प्रशासनाचे लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महसूलमंत्री विखे पाटील यांनी आज संगमनेरात येवून रविवारच्या घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली.


यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, रविवारची घटना काही समाजकंटकांनी घडवून आणली असून त्यातून शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दोन समाजात तेढ निर्माण करुन काहीही साध्य होत नसते. त्यातून सर्वसामान्य माणसांचेच नुकसान होते हे समजून घेण्याची गरज अहे. या घटनेला जबाबदार असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, ज्यांनी हा प्रकार घडवला आहे त्यांच्यावर कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


वास्तविक या घटनेला जोर्वेनाका परिसरात बोकाळलेले अतिक्रमणं आणि त्यात झालेला अवैध धंद्यांचा सुळसुळाट कारणीभूत असल्याचा गंभीर आरोपही महसूलमंत्री विखे पाटील यांनी केला. शहराचे सौहार्द नष्ट करणार्‍या अशा अतिक्रमणांवर नगरपालिकेने वेळोवेळी कारवाई करणे अपेक्षीत असतांना संगमनेरात मात्र तसे होत नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला. अतिक्रमणं करुन तेथे ज्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालतात त्यातून मिळणार्‍या पैशातून अशाप्रकारच्या घटना घडत असल्याने जोर्वेनाका परिसरातील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले.


वाळू तस्करांच्या रिक्षांच्या गोंगाटाने ‘शांती’ घाटावरील कावळेही ‘अशांत’ झाल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी शनिवारी संगमनेरच्या तहसिलदारांनी पाठलाग करुन केलेल्या कारवाईचा दाखला दिला. राज्यात वाळू धोरण जाहीर झाल्यानंतर बेकायदा वाळू उपसा बंद व्हावा यासाठी ठोस उपाययोजना सुरु असून वाळू तस्करांची ओळख पटवण्यासाठी यापुढे ड्रोनचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातून वाळू तस्करांची ओळख पटवून त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्यासही सांगण्यात आल्याचे विखे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.


संगमनेर तालुक्याला वाळू माफियांची मोठी किड लागल्याचा टोला हाणतांना त्यांनी वाळू तस्करांकडून मुदत संपलेल्या व कालबाह्य झालेल्या वाहनांचा वापर गंभीर असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांसमोरच प्रांताधिकारी शैलेश हिंगे व पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करुन संमनेरातील सर्व रिक्षा व अन्य वाहनांची कागदपत्रे तपासण्याची सूचना केली. वाळू तस्करीचा समूळ बिमोड करण्याचाही मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Visits: 77 Today: 1 Total: 395526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *