बंद घराचा दरवाजा तोडून साडेअकरा लाख रुपयांची चोरी! संगमनेर शहरातील पावबाकी रस्त्यावरील घटनेने नागरिकांच्या मनात दहशत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे कोविडच्या संकटाने अख्खा महाराष्ट्र घरात कोंडला गेलेला असतांना, दुसरीकडे या संकटाला संधी समजून आपले काळे उद्योग करणारे घराबाहेर मुक्त संचार करुन सावज हेरीत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सोमवारी रात्री पावबाकी रस्त्यावरील एका बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी तब्बल 11 लाख 50 हजारांची रोकड लांबविली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात आता कोविडसह चोरट्यांचीही दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी सत्तर वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावबाकी रस्त्यावर सदरचा प्रकार घडला आहे. सरोजिनी देशमुख (वय 70) या आपला मुलगा संतोष, सून व नातवंडांसह पावबाकी रस्त्यावरील माताडे मळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा संतोष हा व्यवसायाने पूर्वाश्रमीचा छायाचित्रकार तर सद्यस्थितीत जमीन खरेदी-विक्री करणारा एजंट आहे. रविवारी देशमुख कुटुंब काही कारणास्तव बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचा कडी व कोयंडा उचकटून आंत प्रवेश केला.

विशेष म्हणजे सदरचे घर पावबाकी रस्त्यावर एकांतात असल्याने सुरक्षा म्हणून संतोष देशमुख यांनी हाती आलेली आपल्या व्यवसायाची तब्बल 11 लाख 50 हजारांची रक्कम कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने ठेवली होती. मात्र चोरट्यांनी बरोबर त्याच ठिकाणाहून ती लंपास केली. यावरुन चोरटा एकतर देशमुख कुटुंबियांच्या परिचयाचा असण्याची अथवा त्यांच्या कुटुंबातील हालचालींवर गेल्या काही दिवसांपासून बारकाईने लक्ष ठेवणारा असण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता संबंधित सत्तर वर्षीय महिला घरी परतल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला.

या प्रकरणी सरोजिनी देशमुख यांनी शहर पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तब्बल साडेअकरा लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याने याबाबतची माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण संगमनेरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात आता कोविडसह चोरट्यांचीही दहशत निर्माण झाली आहे.

सध्या संगमनेर तालुक्यात कोविडचा वेगाने प्रादुर्भाव सुरु आहे. अशास्थितीत शासनाने कठोर निर्बंध लागू केलेले असल्याने नागरिक घरबंद झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्येही मोठी घट झाली आहे. मात्र अशाही स्थितीत घराला कुलुप लावून बाहेर जाण्याने काय घडू शकते याचे उदाहरणच पावबाकी रस्त्यावरील या घटनेने उभे केले आहे. संबंधित कुटुंबातील व्यक्तिंकडे इतके पैसे आहेत, ते कोठे ठेवलेले आहेत, कधी गावाला जाणार आहेत, परत कधी येणार आहेत अशा सगळी माहिती असलेल्या व्यक्तिनेच हा प्रकार केला असावा असा पोलिसांचाही संशय आहे. त्या आधारे चोरट्यांचा तपास लागतो का हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 116241

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *