आदिवासी गावांत जपली जातेय गौरवशाली ‘बोहडा’ लोकसंस्कृती लव्हाळवाडीत कलाकारांनी पारंपरिक वाद्यांवर धरला उत्कृष्ट ठेका


नायक वृत्तसेवा, राजूर
महाराष्ट्रात आदिवासी समाजाची गौरवशाली लोकसंस्कृती असून वैविध्यपूर्ण जीवन संस्कार, प्रथा, परंपरा व उत्सव आजही आदिम संस्कृतीची साक्ष देतात. त्याच्या पाऊलखुणा बोहड्याच्या निमित्ताने जिवंत ठेवण्याचे काम आजतागायत अकोले तालुक्याच्या आदिवासी गावांत सुरू आहे.

हजारो वर्षापूर्वी आदिवासी देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे मुखवटे चेहर्‍यावर धारण करत नृत्य करत होते. निसर्ग शक्तीचे ॠण फेडण्यासाठी हा उत्सव साजरा होतो. त्यातील काही परंपरा आजही प्रचलित असल्याचे दिसून येते. बोहडा हा त्यातीलच एक भाग समजला जातो, ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मुखवटे परिधान करुन नृत्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे ‘बोहडा’ हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासी कलाकार पारंपरिक वाद्य संबळ व पिपाण्यांच्या तालावर ठेका धरतात. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात.

अशाच प्रकारच्या बोहड्याचे आयोजन नुकतेच लव्हाळवाडी येथे केले गेले होते. गणपतीच्या सोंगापासून बोहड्याला सुरुवात झाली. त्यानंतर शारदादेवी, खंडेराव, विष्णू, पवन देव, ब्रह्मदेव, बकासूर, नरकासूर, वीरभद्र, वेताळ, बली, पांडवताटी, भीष्म, वाली, सुग्रीव, राम-लक्ष्मण, रावण, अहिरावण-महिरावण, नरकासूर, पुतना मावशी, नारद अशा वेगवेगळ्या सोंगांनी आपली कला सादर केली. सकाळी सात वाजता देवीची मिरवणूक काढली. विधीवत पूजा सुरु असतानाच अनेक भाविकांनी कबूल केलेले नवस फेडले. तसेच देवीला गोड नैवेद्याचा प्रसाद अर्पण केला. या सोंगांच्या सादरीकरणाचा शुभारंभ अगस्ति साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. ठाणे, नासिक जिल्ह्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक लव्हाळवाडीतील बोहड्यासाठी उपस्थित राहिले.

हौसेला मोल नाही..
बोहड्याच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक पात्राला स्वतःच्या खर्चाने साहित्य खरेदी करावे लागते. तर बोहडा मंडळाचाही एक लाखाच्या आसपास आयोजनासाठी खर्च झाला. आज महागाई गगनाला भिडलेली असतानाही आदिवासी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी ही मंडळी धडपडताना दिसून आली. यंदा पाऊस चांगला पडावा, गावावर रोगराईचे संकट येऊ नये, आपली मुलंबाळं अबाधित राहावी, गुरा-ढोरांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा अशी प्रार्थना बोहड्याच्या निमित्ताने देवीपुढे केली.
– रावजी मधे व अर्जुन खोडके (बोहडा आयोजक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *