‘अखेर’ जोर्वे रस्त्यावरील ‘दादागिरी’ संपुष्टात! प्रचंड पोलीस बंदोबस्तात कारवाई; रस्त्यावरील अतिक्रमणं भुईसपाट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सार्वजनिक वाहतुकीची एैशीतैशी करीत भररस्त्यात फळे, भजे, वडे व चहाची दुकाने थाटून सामान्य वाहतुकदारांना वेठीस धरणार्या आणि सवाल करताच झुंडीने त्याच्यावरच चाल करणार्या जोर्वे नाक्यावरील गुंडांचे अतिक्रमण अखेर हटविण्यात आले आहे. आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून पुणे रस्त्यापासून जोर्वेच्या दिशेला असलेली सुमारे पंधराहून अधिक दुकाने हटविण्यात आली आहे. सुरुवातीला अतिक्रमण धारकांच्या समर्थकांनी या कारवाईला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तासमोर तो अगदीच नगण्य ठरला.
रविवारी (ता.28) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोर्वे नाक्यावरील याच अतिक्रमण धारकांमुळे वाहतुकीचा नेहमीप्रमाणे खोळंबा झाला होता. अनेकवेळ वाहने रस्त्यावरच खोळंबलेली असतांनाही शासकीय जागेवरच बिनधास्त दुकाने थाटून बसलेल्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नव्हते. त्यामुळे पशुखाद्य खाली करुन जोर्वेकडे निघालेल्या शेतकर्यांच्या मुलांनी ‘हॉर्न’ वाजवला. त्याचा राग येवून वडेवाले, भजेवाले, चिकनवाले, चहावाले अशा दुकानदारांच्या वेशातील गावगुंडांनी ‘त्या’ चौघाही निष्पाप मुलांना बेदम मारहाण केली.
सदरचा प्रकार जोर्वे गावात समजल्यानंतर गावातील अन्य सहा जणांनी शहरात येवून पोलीस तक्रार केली व आपल्या जखमी मित्रांना रुग्णालयात भरती केले. तेथून रात्री साडेनऊच्या सुमारास घराकडे जात असतांना या गुंडांनी त्यांनाही गाठले आणि पोलीस तक्रार केली म्हणून थेट तलवारी, चॉपर, रॉड, दांडके अशा जीवघेण्या शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चौघांना गंभीर दुखापती झाल्या. हा प्रकार संगमनेरसह जोर्वे, रहिमपूर, कनोली, कोल्हेवाडी या गावांमध्ये समजताच मोठा तणाव निर्माण झाला.
या सर्व घटनांची गांभीर्याने दखल घेत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आज (ता.30) सकाळी साडेआठ वाजता मोठ्या फौजफाट्यासह जोर्वे नाक्यावर धडक देत पुणे रस्त्यापासून जोर्वेकडे जाणार्या रस्त्यावरील पंधराहून अधिक अतिक्रमणे भुईसपाट केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह शहर व तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व धडक कृती दलाच्या जवानांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.