मराठा आरक्षणाच्या महायज्ञात आणखी एका तरुणाची आहुती! संगमनेर तालुक्यातील झोळ्याची घटना; पत्र्याच्या शेडमध्ये घेतला गळफास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरुन गेल्या सात दिवसांपासून अंतरवाली सराटीत सुरु असलेल्या उपोषणाची धग आता राज्यभर पसरली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरात ठिकठिकाणी उपोषण, मोर्चे, निवेदने देण्याचे कार्यक्रम सुरु असताना मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यातच संयम गमावल्याने राज्यात आत्तापर्यंत जवळपास दहापेक्षा अधिक तरुणांनी आत्महत्या केल्याने आरक्षणावरुन राज्यात वणवा पेटल्याचे चित्र असताना उत्तर महाराष्ट्रातील संगमनेरमधूनही आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर भाऊसाहेब वाळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो तालुक्यातील झोळे गावचा रहिवासी आहे.

सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सकल मराठा समाजाचा आक्रोश बघायला मिळत आहे. अल्पभूधारक आणि अतिशय साधारण कुटुंबात जन्मलेल्या अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथील मनोज जरांगे यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या गावातच आंदोलनाची मशाल पेटवली. त्यातून सरकारला जाग आल्यानंतर राज्य सरकारने आरक्षणाबाबत काही हालचाली करीत जरांगे यांच्याकडून वेळ मागवून घेतला. त्यानुसार राज्य शासनाच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ देवून आपले आंदोलन स्थगित केले. या दरम्यानच्या काळात आंदोलनाची तीव्रता कमी होईल असा राज्य सरकारचा कयास होता. मात्र तो सपशेल फोल ठरवताना जरांगे यांनी राज्यभर दौरे करीत मराठा समाजाला जागवण्याचे काम केले.

त्यातून जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पेटलेल्या मशालीने गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनांच्या खैरातीवर हेलकावे घेणार्‍या आरक्षणाच्या विषयाचा महायज्ञ चेतवला. राज्य सरकारला दिलेल्या कालावधीत वचनपूर्ती न झाल्याने पाटलांनी गेल्या २५ ऑक्टोबरपासून पुन्हा प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाच्या या दुसर्‍या टप्प्यात मात्र राज्यातील संपूर्ण मराठा समाज एकवटला असून राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बहुतेक सर्वच ठिकाणी प्राणांतिक उपोषणही केले जात असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

या दरम्यानच्या कालावधीत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून दहापेक्षा अधिक मराठा तरुणांनी आता संयमाचाच अंत झाल्याने टोकाची भूमिका घेत आत्महत्या केल्या आहेत. त्याची सर्वाधिक झळ मराठवाड्यालाच बसली असून तेथील सुमारे सात तरुणांनी आरक्षणासाठी आपला बळी दिला आहे. संयम गमावून निराश झालेल्या तरुणांमध्ये आता उत्तर महाराष्ट्रातील संगमनेरचाही समावेश झाला असून आज (ता.३१) पहाटेच्या सुमारास शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील झोळे गावातील सागर भाऊसाहेब वाळे (वय २७) या पदवीधर शेतकरी तरुणाने आत्महत्या केली. आपल्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हुकाला गळफास बांधून त्याने आरक्षण आंदोलनाच्या महायज्ञात उडी घेत आपली आहुती दिली. बाजूलाच पडलेल्या वहीत ‘आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरु नये. एक मराठा लाख मराठा, आपला लाडका सागर मराठा.’ असा मजकूर लिहिलेला आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. मयत सागर वाळे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर झोळ्यातील अमरधाममध्ये त्याच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठा समाजातील नागरीक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.


अंतरवाली सराटी येथून चेतलेल्या आंदोलनाच्या मशालीची धग राज्यभर पसरली असून संगमनेरातही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाने प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात चौघे आमरण उपोषण करीत असून अन्य त्यांच्या सोबत साखळी उपोषण करीत आहेत. आज सकाळी सागर वाळे या तरुणाच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर येथे बसलेल्या आंदोलकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. जरांगे पाटलांनी हिंसा व आत्महत्या न करण्याचे आवाहन केल्यानंतरही काही मराठा तरुण टोकाचा निर्णय घेत असल्याबाबत या आंदोलकांनी चिंताही व्यक्त केली. प्रत्येकाने ध्यैर्य राखावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *