आता राजकारण समजेना! श्रीरामपूरमध्ये विखे-थोरातांची युती बाजार समितीच्या नूतन संचालकांचा संगमनेरात थोरातांकडून सत्कार
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
विखे-ससाणे-मुरकुटे यांच्या युतीने श्रीरामपूर बाजार समितीवर वर्चस्व मिळवले. या युतीच्या विरोधात आमदार लहू कानडे यांनी लढत देत काँग्रेसला संजीवनी देण्याचे काम केले. आता बाजार समितीचा धुरळा खाली बसला नाही, तोच विखेंसोबत युती व माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून नूतन संचालकांच्या सत्कारामुळे शहरात होणार्या कार्यक्रमांतून यावर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांची समीकरणे बदलण्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत विखे-ससाणे-मुरकुटे यांच्या युतीचे जागावाटपावर मुंबईत एकमत झाले. मात्र, यावर अंतिम निर्णय लोणीतील वाड्यावर झाला. यादरम्यान काँग्रेसचे आमदार कानडे जपान दौर्यावर होते. दौर्यावर जाण्यापूर्वीच त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे गट यांची बैठक घेत आघाडीचे पाऊल उचलले होते. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू अशोक कानडे यांनी या आघाडीवर शिक्कामोर्तब करत शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली रणशिंग फुंकले. आघाडी होऊनही जागावाटपावरून तू-तू, मैं-मैं सुरूच होते. मात्र, लढत द्यायची या उद्देशाने पॅनल उभे राहिले.
माघारीनंतर आमदार कानडे यांचे आगमन झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनीही श्रीरामपुरात तळ ठोकला. या द्वयीने मतदारसंघातील ग्रामपंचायत व सेवा संस्थांतील सदस्यांच्या गाठीभेटींवर भर दिला. सोबतीला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होतेच. बाजार समितीतील प्रमुख मुद्द्यांना हात घालत निवडणुकीत रंगत आणली. दुसरीकडे, युतीमध्येही सर्वच काही आलबेल नव्हते. व्यापारी मतदारसंघाची एक जागा ससाणे गटाला गमवावी लागली. हमाल मापाडीतील जागाही अवघ्या नऊ मतांनी पारड्यात पडली. दुसरीकडे, युतीवरून, तसेच तिकीट कापल्याने असलेली नाराजी, विकासकामांच्या मदतीने कानडे यांनी आदिक, शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे यांच्या साथीने जवळपास 37 टक्के मतदान घेतले. मात्र, ते विजयाच्या समीप जाण्यात अपयशी ठरले.
एवढी राजकीय उलथापालथ होऊनही जिल्हा बँकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या गटाच्या निवडून आलेल्या संचालकांचा संगमनेरला थोरात यांच्या उपस्थितीत सत्कार पार पडला. निवडणुकीत आमदार कानडे यांनी काँग्रेसचा गड शाबूत ठेवताना केलेल्या कष्टाचे काय, अशी चर्चा आता झडू लागली आहे. त्यामुळे विखे यांच्याशी युती करत थोरात यांनी केलेला सत्कार भविष्यातील समीकरणे बदलणार असल्याचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे.