संजीवन रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांना जमावाची मारहाण! विरोधी गटावर रुग्णालयातील कर्मचार्यांनीही चढवला जोरदार हल्ला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
उपचारा दरम्यान रुग्णाचा मृत्यू आणि त्याचे पार्थिव ताब्यात देण्यापूर्वी बील भरण्यास सांगीतल्याचा रागातून दहा जणांच्या जमावाने संजीवन रुग्णालयातील दोघा डॉक्टरांना बेदम मारहाण करीत रुग्णालयातील सामानाची तोडफोड केली. या प्रकरणी डॉ.स्वप्नील भालके यांनी तर, नातेवाईक मयत झालेला असतांना बील भरण्यास सांगून रुग्णालयाबाहेर काढीत पंधरा जणांनी प्राणघातक शस्त्रांसह मारहाण करुन जखमी केल्याची फिर्याद हसनापूर येथील समीश शेख लालशेख यांनी दिली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी दोन्ही गटातील पंचवीस जणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून कोविड लढ्यात सहभागी झालेल्या रुग्णालयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (ता.24) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घुलेवाडीतील संजीवन रुग्णालयात उपचार घेणार्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी संबंधित रुग्णाचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यातील काहींनी रुग्णालयात जावून रुग्णाची कृत्रिम श्वसनयंत्रणा बंद का केली? अशी विचारणा करीत डॉ.स्वप्नील भालके व डॉ.जगदिश वाबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली व डॉ.भालके यांचा मोबाईलही हिसकावून घेतला. यावेळी जमलेल्या अन्य मंडळींनी रुग्णालयातील साधनसामुग्रीची तोडफोड करीत मोठे नुकसान केले. याप्रकरणी डॉ.स्वप्नील भालके यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी मध्यरात्री नंतर अज्ञात आठ ते दहा इसमांविरोधात संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 323, 327, 427, 504, 143, 147 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तर याच प्रकरणात मयत झालेल्या इसमाचे नातेवाईक समीर शेख लालशेख यांनीही संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदिश वाबळे व अन्य दहा ते पंधरा जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधिताच्या नातेवाईक रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉ.वाबळे यांनी ‘दिड लाख रुपये बील भरा व तुमच्या मयताचे प्रेत घेवून जा’ असे सांगत आम्हा सर्वांना रुग्णालयाबाहेर काढून दिले. त्याशिवाय आरोपीने दहा ते पंधरा जणांचा जमाव जमवून फिर्यादी व साक्षीदारांना लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले, तसेच फिर्यादीच्या जीपचेही नुकसान केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन डॉ.जगदिश वाबळे व अन्य दहा ते पंधरा अज्ञात इसमांविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 323, 326, 427, 143, 147 नुसार आज पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.

संगमनेरातील घुलेवाडीनजीक असलेले संजीवन रुग्णालय कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु करणारे संगमनेरातील पहिले खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत शेकडों रुग्ण दाखल झाले व उपचार घेवून घरीही परतले. दुर्दैवाने त्यातील काहींचे बळीही गेले. मंगळवारीही अशीच घटना घडली, त्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले आणि त्याचे पर्यवसान एकमेकांवर हल्ला करण्यात झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूने परस्पर विरोधी तक्रारी झाल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावृत्ताने मात्र वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कोविड या वैश्विक महामारीने अवघा देश भयभीत झालेला असताना सुरुवातीला अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने व मोबाईल बंद करुन अज्ञातवास पत्करला होता. संगमनेरातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. मात्र अशावेळी संजीवन रुग्णालयाने पुढाकार घेत आपले संपूर्ण रुग्णालय कोविड रुग्णांसाठी सुरु करुन प्रशासनाला मोठा दिलासा दिला. अर्थात या कालावधीत या रुग्णालयावर बीलांवरुन अनेक आरोपही झाले होते. आज त्यावरुन थेट हाणामार्या झाल्याने कोविड यौद्धे म्हणून गौरवप्राप्त झालेल्यांना मारही खावा लागला आणि त्यांनी मारही दिला.

