संगमनेरचे ‘जीवरक्षक’ प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांची बदली! संगमनेरात घडले पथदर्शी काम; आता शैलेश हिंगे यांच्यावर संगमनेर उपविभागाचा भार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चार वर्षांहून अधिक कालावधीपासून संगमनेर उपविभागाचा यशस्वी कार्यभार सांभाळणार्‍या प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची नियुक्ती झाली असून 10 मे पूर्वी त्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी येथील आपल्या कार्यकाळात अनेक प्रलंबित कामे पूर्ण करतानाच कोविड संक्रमणात बजावलेली पालकाची भूमिका आणि तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठीचे भूसंपादन, तसेच सूरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड महामार्ग व पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे भूसंपादनही त्यांनी मार्गी लावले.

चार वर्षांपूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. शशीकांत मंगरुळे यांची संगमनेरचे उपविभागीय अधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. संगमनेरसह राहाता व अकोले विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या संगमनेर तालुक्यातील या निवडणुका पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांनी विशेष उपाययोजना केल्या होत्या. त्यानंतर काही कलावधीतच देशासह संगमनेरातही कोविड संक्रमणाचे भय निर्माण होवून नागरिक सैरभैर झाले. अज्ञात रोगाचे संक्रमण आणि जनमानसासह वैद्यकिय क्षेत्रातही त्याबाबतचे अज्ञान यातून त्यावेळी सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा स्थितीत डॉ. मंगरुळे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा वापर करुन संगमनेर व अकोले तालुक्यातील सर्वसामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अविस्मरणीय ठरावे असेच होते.

त्यावेळी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडून भाजपाशी काडीमोड करुन सत्तेत आलेली महाविकास आघाडी, शासन आणि प्रशासनात सुसूत्रता निर्माण होण्यापूर्वीच राज्यात झपाट्याने पाय पसरणारे संक्रमण, बाधित झालेल्या रुग्णांच्या तपासण्या, उपचार आदिंबाबत फारशी स्पष्टता आणि संक्रमणातून लोकांना वाचवण्यासाठी निधीची कमतरता असे असंख्य प्रश्न समोर असतांनाही त्यांनी न डगमगता आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करुन ‘संगमनेर सहाय्यता कोष’ची स्थापना करुन निधी जमवला व त्यातून संगमनेरातील शासकीय आरोग्य यंत्रणेला बळ दिले. संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात जिल्ह्यातील पहिले शासकीय कोविड तपासणी व उपचार बाह्य केंद्र सुरु होणे हा त्याचाच परिपाक होता.

कोविड संक्रमणाच्या संपूर्ण कालावधीत प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी विविध शासकीय विभागांशी समन्वय ठेवून कोविड विरोधातील लढा अधिक दमदार केला. स्वतः वैद्यकिय क्षेत्रातील असल्याने त्याचा वापर करुन त्यांनी अगदी संक्रमणाच्या सुरुवातीला आरोग्य सुविधांची गरज ओळखून संगमनेर-अकोल्यातील जनतेला स्थानिक पातळीवरच परिपूर्ण उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह मोठ्या खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून शहर व तालुक्यात मिळून एकाचवेळी जवळपास दोन हजार बाधित रुग्णांवर उपचार होतील अशी व्यवस्था उभी केली. त्याचा फायदा केवळ संगमनेर, अकोलेच नव्हेतर अहमदनगर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, ठाणे अशा अनेक ठिकाणच्या रुग्णांना झाला आणि त्यातून अनेकांचे जीवही वाचले.

दुसर्‍या संक्रमणात देशभरात ऑक्सिजनची कमरता निर्माण झाली होती. संक्रमणाचा वेग आणि बाधित रुग्णांची संख्या यामुळे त्यावेळी संगमनेर-अकोले तालुक्यातील सर्व रुग्णालये तुडूंब होती. अशावेळीही ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा जीव गेल्याचे एकही उदाहरण संगमनेरातून समोर आले नाही याचे संपूर्ण श्रेय डॉ. मंगरुळे यांनाच जाते. याच कालावधीत त्यांच्या मातोश्रींचेही निधन झाले होते. त्यासाठी अवघ्या दीड दिवसांची सुट्टी घेवून ते माघारी कर्तव्यावर परतले आणि स्वतःही कोविड बाधित होवून विलगीकरणातही गेले. मात्र त्यानंतरही त्यांनी लोकांना जगवण्याचा, त्यांना आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न कायम ठेवला. त्यातूनच संगमनेरकर त्यांना ‘जीवरक्षक’ प्रांताधिकारी म्हणून ओळखू लागले.

कोविडच्या सुरुवातीच्या काळात पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून उत्तरेकडे पायपीट करीत निघालेल्या मजुरांची खूप मोठी संख्या होती. वाहतूक व्यवस्था पूर्णतः बंद असल्याने ही मंडळी बायाबापड्यांसह शेकडो किलोमीटरचे अंतर कापून संगमनेर तालुक्यातून जवळपास पन्नास किलोमीटरचे अंतर कापून नाशिकच्या दिशेने जात होती. त्यांची उपासमार होवू नये यासाठी प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी शहरातील विविध सामाजिक संस्थांशी संवाद साधून स्थलांतरीतांच्या अन्नपाण्याची सोय करण्यासह शहरातील भिक्षेकरी, निराधार यांच्यापर्यंतही अन्न पोहोचवण्याची साखळी उभी केली. त्यांनी कोविडच्या काळात केलेले काम शेकडो संगमनेरकरांचे जीव वाचवणारे ठरले.

याशिवाय उत्तर नगर जिल्ह्यासाठी आणि खास करुन संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या भूसंपादनात वारंवार येणारे अडथळे दूर सारण्यासाठी त्यांनी संगमनेर व अकोले तालुक्यातील शेतकरी, आंदोलक यांच्याशी सातत्याचा संवाद ठेवून या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सतत चालना देण्याचेही काम केले. नव्याने होत असलेला सूरत-हैद्राबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठीचे भूसंपादनही अंतिम टप्प्यात असून पुणे-नाशिक या महत्त्वकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी तालुक्यातील 26 गावांमधील भूसंपादनाचे कामही त्यांनी पूर्ण केले आहे. महाराजस्व अभियानातून उपविभागातील शिवार रस्त्यांची असंख्य कामे, मतदार जागृती मोहीम, अमृत जवान योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पानी फौंडेशनच्या पाणीदार शिवार योजनेला प्रोत्साहन आणि आपल्या कार्यकाळात विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखले मिळवण्यात येणार्‍या अडचणी दूर करुन चार वर्षात 70 हजारांहून अधिक दाखल्यांचे केलेले वितरण आणि चारही वर्षात शंभर टक्के शासकीय वसुली हे त्यांच्या येथील कारकीर्दीतील ठळक मुद्दे आहेत.

गेल्या चारवर्षाहून अधिक काळापासून संगमनेर उपविभागाचे पालक म्हणून सेवा बजावणार्‍या प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांची बदली क्रमप्राप्त होती. त्यांच्या जागी यापूर्वी वाशिम जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती महसुली मंडलात कार्यरत असलेल्या 2009 बॅचच्या शैलेश हिंगे या अवघ्या 42 वर्षीय तरुण उपविभागीय अधिकार्‍यांची संगमनेरचे नूतन प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. 10 मे पूर्वी त्यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारावा असे आदेश बजावण्यात आल्याने येत्या दोन दिवसांत ते संगमनेरात दाखल होण्याचा अंदाज आहे.


मागील चार वर्षांच्या येथील कारकीर्दीत संगमनेरकरांचे भरपूर सहकार्य आणि प्रेम मिळाले त्यामुळे कर्तव्य बजावताना उत्साहाची कोठेही कमतरता भासली नाही. कोविड संक्रमणाच्या काळात येथील सामाजिक संस्था, व्यक्ती व वैद्यकीय क्षेत्राची मोठी साथ मिळाली. दुष्काळी भागाला संजीवनी देणार्‍या निळवंडे धरणाच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागले ही सर्वाधिक समाधानाची गोष्ट आहे. सूरत-हैद्राबाद या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी 26 गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थी व नागरिकांची दाखल्यांसाठी होणारी धावपळ कमी करता आली. सलग चार वर्ष शंभर टक्के शासकीय वसुलीचे उद्दिष्टही पूर्ण झाले याचा मनस्वी आनंद आहे. दहा वर्षांच्या शासकीय सेवेत संगमनेरसारखे प्रेम यापूर्वी कोठेही मिळाले नाही.
– डॉ. शशीकांत मंगरुळे
उपविभागीय अधिकारी

Visits: 25 Today: 2 Total: 116917

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *