वांबोरीतील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह परिसरातील विहिरीतील पाण्यावर तरंगताना नुकताच आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी (ता.7) दुपारी दोनच्या सुमारास घरापासून बेपत्ता झालेली किरण गणेश पाठक (वय 13) ही मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर परिसरात सर्वत्र शोध घेतला असता कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, त्याच रात्री वांबोरी दूरक्षेत्र येथे वडील गणेश (दत्ता) मनोज पाठक यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत बर्हाटे, पोलीस हवालदार दिगंबर चव्हाण, पोलीस शिपाई रमेश शिंदे आदिंनी घटनास्थळास भेट देऊन बेपत्ता किरणचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी (ता.8) सायंकाळी पाचच्या सुमारास वांबोरी-विळद रस्त्याच्या कडेला भारत जाधव यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मयत किरणचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालयात हलविला. मात्र, ही आत्महत्या की घातपात हे तपासातूनच निष्पन्न होणार आहे.
