सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली 40 वा पुण्यतिथी सोहळा; सुमारे एक लाख भाविकांनी घेतले दर्शन
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील श्री देवगड गुरुदेव दत्तपीठाचे निर्माते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भास्करगिरी बाबांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.15) उत्साहात प्रारंभ झाला. पंचदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने देवगड येथे शेकडो दिंड्यांनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जयचा जयघोष करत हजेरी लावली. या अवधूत चिंतनाने देवगड नगरी दुमदुमली होती.
सद्गुरू किसनगिरी बाबांच्या 40 व्या पुण्यतिथी निमित्ताने श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे महाविष्णूयाग व ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधी मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी यज्ञ मंडपात महाविष्णू यागासही प्रारंभ करण्यात आला. तर भगवान दत्तात्रयांच्या मुख्य सभामंडपात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास व्यासपीठचालक म्हणून नारायण महाराज ससे, संजय महाराज निथळे, कोंडीराम महाराज पेचे हे सेवा देत आहे.
दुपारी झालेल्या आरती प्रसंगी आलेल्या सर्व दिंड्यांचे भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी स्वागत केले. वेदमंत्राच्या जयघोषात महाआरती करण्यात आली. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य कांता जोशी, रामभाऊ काटकर, स्वानंद जोशी, ज्ञानेश्वर काटकर यांनी केले. उपस्थित भाविकांना गंगापूर येथील नंदलाल सोमाणी व परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या पुण्यतिथी सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले.