बैलाने मालकालाच शिंगावर घेऊन जमिनीवर आपटले मालकाचा मृत्यू; काळे कारखाना बैलगाडी यार्डातील घटना


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शेतकरी आणि ऊस तोडणी मजुराचा खरा मित्र म्हणजे बैल. मात्र हाच बैल ऊसतोडणी मजूर असलेल्या त्याच्या मालकाचा वैरी ठरला असून बैलाने शिंगावर घेऊन आपटल्याने इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऊस वाहतुकीसाठी असणार्‍या बैलाने ऊसतोडणी कामगाराला शिंगावर उचलून जमिनीवर टाकल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी हद्दीतील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना बैलगाडी यार्डात सोमवारी (ता.13) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

दामू रंभा सपनार (वय 58, रा. नीरगाव, ता. सिन्नर, जि.नाशिक) असे मृत ऊसतोडणी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उस तोडणी कामगार असलेले दामू सपनार सोमवारी सायंकाळी यार्डात होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक बैलाने हल्ला केला. बैलाने त्यांना शिंगावर उचलून घेत जमिनीवर टाकले. त्यात त्यांच्या डोक्याला मागच्या बाजूने गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी अवस्थेत स्थानिक डॉ. दत्तात्रय कोळपे यांच्या क्लिनिक येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.

त्यानंतर कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारांसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर काही वेळाने तेथील वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांना मयत घोषित केले. दरम्यान शवविच्छेदनानंतर उशिरा सपनार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हंगाम अवघा काही दिवसावर येवून ठेपला असताना सपनार यांच्या दुर्दैवी मृत्यूने ऊसतोडणी कामगार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 194 Today: 1 Total: 1883673

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *