रानभाज्यांनी नटले कळसूबाई विद्यालयाचे प्रांगण ए. एस. के. फाउंडेशन व बायफचा संयुक्त उपक्रम


नायक वृत्तसेवा, अकोले
ए. एस. के. फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ संचलित समृद्ध ग्राम प्रकल्पांतर्गत तालुक्यातील जहागिरदारवाडी येथील कळसूबाई विद्यालयाच्या प्रांगणात रानभाजी महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी जंगलातून शोधून आणलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या.

विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टाने आणि उत्सुकतेने जंगलातून जमा केलेल्या रानभाज्या शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध पद्धतीने मांडल्या होत्या. फादा, दिवा, बडदा, चांई, रानकेळी, अळू कंद, अळूची पाने, भारंगी, कुरडू, कौला, बर्की, आघाडा, कौदर, भोकर, चिचुर्डा, पाथरी, कोंबडा, कोळू, थरामटा या विविध प्रकारच्या रानभाज्यांनी शाळेचे प्रांगण फुलून गेले होते. विद्यार्थ्यांनी आनंदाने या महोत्सवात सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांच्या रेसिपी देखील स्वतःच्या डब्यात बनवून आणल्या होत्या. रानभाजी महोत्सवामध्ये ग्रामस्थ, महिला आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच वैशाली खाडे, रानभाजी तज्ज्ञ बाळू घोडे, बायफचे विभागप्रमुख जितीन साठे, जलतज्ज्ञ रामनाथ नवले, प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे, पर्यटन मार्गदर्शक पंढरीनाथ खाडे, हिरामण खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रानभाजी तज्ज्ञ बाळू घोडे यांनी आपली जंगल संपत्ती किती विपूल आहे याचे उदाहरण दिले. जंगलामध्ये निर्माण होणार्‍या भाज्या मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि सात्विक आहे. रानभाज्यांची ओळख प्रत्येक विद्यार्थ्याला होणे अत्यंत आवश्यक आहे. रानभाज्यांचे संवर्धन पुढच्या पिढीला करणे गरजेचे आहे. आपल्या आहारातून रानभाजी नामशेष करण्यापासून वाचवणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी प्रास्ताविकपर भाषणात रानभाजी महोत्सवाचे महत्त्व पटवून दिले. रानभाज्यांचे आपल्या आहारातील महत्त्व त्यापासून मिळणारे खनिजे व जीवनसत्व यामुळे शरीराची वाढ व बौद्धिक विकास कसा होतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. रानभाज्यांची साठवणूक करून पर्यटकांना त्या खाऊ घातल्या तर त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची संधी आपल्या तरुणांना असल्याचे त्यांनी नमूद केले. चाई, दिवा, बडदा, जंगली सुरण, कोचे कंद यांसारख्या भाज्यांची लागवड भविष्यात व्यापारी तत्त्वावर सुद्धा होऊ शकते असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक विद्यार्थ्याला या भाज्यांबद्दल माहिती व्हावी म्हणून या प्रदर्शनात शिक्षकांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत जहागिरदारवाडी, सर्व सदस्य तसेच पर्यटन व्यवसायाला चालना देणारे तरुण साहेबराव खाडे, पंढरीनाथ खाडे, बाळू घोडे, विमल घोडे, हिरामण खाडे तसेच बायफ संस्थेच्यावतीने शिक्षण मित्र उपक्रम समन्वयक मच्छिंद्र मुंढे, विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, सुनील बिन्नर, वर्षा भागडे, राम कोतवाल यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कळसूबाई विद्यालयाचे प्राचार्य जाधव आर. सी. यांच्या मार्गदर्शनाखाली खराटे टी. बी., कानवडे आर. डी., कासार डी. एम., देशमुख पी. जी., खाडे ए. के. चाऊंडके एम. एन., जाधव एस. टी., सहाणे व खाडे व्ही. एन., खाडे के. टी., इनामदार आर. ए., सदगीर बी. डी. या शिक्षकांनी व कर्मचार्‍यांनी विशेष योगदान दिले. सूत्रसंचालन जाधव एस. टी. यांनी केले तर आभार रामचंद्र कानवडे यांनी मानले.

Visits: 3 Today: 1 Total: 30676

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *