चांगल्या पुस्तकाच्या वाचनाने आदर्श व्यक्तिमत्त्वाचा पिंड घडतो ः डॉ. मालपाणी संगमनेर महाविद्यालयात विविध गुणदर्शन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
चांगल्या पुस्तकाच्या वाचनाने मनाची मशागत होते आणि मन समृद्ध होते. एवढेच नव्हे तर मनाची भावशुद्धी पुस्तकाच्याच वाचनातून होते. मुलांवर दर्जेदार संस्कार करण्याचे काम पुस्तकं करत असतात. पुस्तकेच इतिहास घडवत असतात. पुस्तकाच्या सान्निध्यात असणारा माणूस विचाराने खूप श्रीमंत असतो. जे विद्यार्थी चांगल्या पुस्तकाचे वाचन करतात, त्यांच्या आयुष्यात आदर्श असा वक्तृत्वाचा पिंड घडतो, ज्ञानाची अभिवृद्धी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासून वाचनाची सवय लागली तर निश्चितच चांगले उद्दिष्ट ते गाठू शकतात असे प्रतिपादन डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
श्री दामोदर मालपाणी मेमोरियल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ, संस्कृत विभाग, संगमनेर महाविद्यालय व महाविद्यालय शाळा समूय योजनेच्या ‘संस्कृत-मराठी-इंग्रजी विविध गुणदर्शन’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत हाते. पुढे बोलताना ते म्हणाले, पुस्तकाच्या सान्निध्यात असणारा माणूस मनाने शुद्ध राहतो. अंत:करण शुद्ध होते. विद्यार्थ्यांनी चांगल्या पुस्तकांचे वाचन करायला शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनाचा तप करणे आवश्यक आहे. ऑनलाइन कोविडच्या कठीण काळातही ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा अखंडपणे राबविली गेली ही खूप अभिमानाची बाब असल्याचे शेवटी आवर्जुन नमूद केले.
यावेळी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष शांताराम डोंगरे, संस्कृत विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, इंग्रजी विभागातील प्रा. अरुण लेले आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत विभागातील विद्यार्थिनी स्वराली संत या विद्यार्थिनीने ईशस्तवन करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. पारितोषिकासाठी पात्र शाळांतील मुख्याध्यापक व विद्यार्थी कोविडचे नियम पाळून हजर होते. सूत्रसंचालन डॉ. रोशन भगत यांनी केले तर आभार प्रा. अरुण लेले यांनी व्यक्त केले. सदर स्पर्धेसाठी संस्कृत विषयाकरिता प्रा. विजय भोर, प्रा. योगिता पाटील, इंग्रजी विषयासाठी प्रा. अरुण लेले, प्रा. सुरेखा भवन तर मराठी विषयाच्या स्पर्धेसाठी प्रा. सारिका शिंदे प्रा. डॉ. शरद थोरात यांनी नियोजन केले.