कोपरगाव पालिका कर्मचार्‍यांच्या अरेरावीचा व्यापारी महासंघाकडून निषेध दुकानांत घुसून व्यापार्‍यांवर प्लास्टिक विरोधात केली दंडात्मक कारवाई

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरात पालिकेने प्लास्टिक वापरावर जप्तीच्या कारवाया केल्या. या कारवाया करताना एकावेळी 10 ते 12 पालिकेच्या कर्मचार्‍यांनी दुकानात घुसून अरेरावीची व दमदाटीची भाषा करून असभ्य वर्तन केले. ज्या व्यापार्‍यांच्या दुकानात 50 मायक्रोच्या पुढच्या पिशव्या आहेत त्या जप्त केल्या. त्यामुळे भयभीत झालेल्या व्यापार्‍यांचा रक्तदाब वाढून शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने निषेध केला असल्याचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी सांगितले.

कोपरगाव शहरातील दुकानांत नगरपालिका कर्मचारी प्लास्टिक पिशव्या वापराबाबत दंडाच्या पावत्या फेकत, अरेरावीची भाषा करत निघून गेले. व्यापार्‍यांनी नम्रतापूर्वक व सभ्यपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु हे कर्मचारी ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केली याचे सर्व व्यापारी समर्थन करत आहे. मात्र, व्यापारी 50 मायक्रोच्या पुढे पिशव्या वापरात असताना सुद्धा त्यांच्यावर अरेरावीची व दमदाटी केली. व्यापारी 50 मायक्रोच्या पुढील पिशव्या वापरतील. परंतु भाजीपाला, फळ विक्रेते, चहा विक्रेते अशा किरकोळ विक्रेत्यांना या पिशव्या वापरणे परवडणारे नाही. याबाबत शासनाने देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच कोपरगाव नगरपालिकेने देखील हा पर्याय उपलब्ध करण्यास पुढाकार घेतल्यास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यात सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच शहरात व्यापारी महासंघ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे, शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तलावातील गाळ काढणे, कोरोना काळात अन्नदान योजना राबविणे यांसारख्या अनेक सामाजिक योजनांत नेहमीच पुढाकार घेत असतो. खराब रस्ते, प्रचंड धुळीचा त्रास सहन करत व्यापारी आपली दुकान चालवत आहे. कोरोना काळात प्रचंड मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आता कुठे पुन्हा स्थिरस्थावर होत असताना होत असेलेली धडक कारवाई ही व्यापार्‍यांना जाचक होत आहे. तसेच व्यापार्‍यांनाही 50 मायक्रोपेक्षा खाली कॅरीबॅगा वापरू नये असेही आवाहन व्यापारी महासंघाच्यावतीने कण्यात येत असल्याचे अध्यक्ष कोयटे यांनी केले आहे.

Visits: 138 Today: 1 Total: 1415655

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *