प्रवरा नदीपात्र दूषित करणार्यांवर कारवाई करा! संगमनेर नगरपालिकेकडे बजरंग दलाची निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातून वाहणार्या प्रवरा नदीमध्ये कोंबडी व अन्य पशुंचे कत्तल केलेले निरुपयोगी अवशेष मोठ्या प्रमाणात टाकले जात आहे. यामुळे पाणी दूषित होत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याशिवाय परिसरात देखील दुर्गंधी पसरत आहे. यावर नगरपरिषदेने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी बजरंग दलाच्यावतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर निवेदनात बजरंग दलाने म्हटले आहे की, शहरातील मटन व चिकन विक्रेते कोंबडी व अन्य पशुंचे कत्तल केलेले निरुपयोगी अवशेष, पिसे, कातडी प्रवरा नदीपात्रात बिनधास्तपणे टाकून देतात. यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात येण्यासह पाणी देखील दूषित होत आहे. याशिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यापूर्वी देखील नगरपालिकेला वारंवार कडक कारवाई करण्याबाबत अनेकदा बजरंग दल व संगमनेर खुर्द ग्रामपंचायतने निवेदने दिलेली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

नगरपालिकेने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून कोंबडी व पशुंचे निरुपयोगी अवशेष टाकणार्यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, शुभम कपिले, अजिंक्य डोंगरे, दीपक मेहेत्रे, आनंद मिसाळ, आदित्य गुप्ता आदिंनी दिला आहे.

अधिक श्रावण महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात हिंदू पवित्र अमृतवाहिनी नदीत स्नान करतात. मात्र, हिंदूंचा धर्म बाटवण्यासाठी संगमनेर शहर व परिसरातील खाटीक हे गोमांसाचे तुकडे, कोंबडीची पिसे, बोकड्यांचे अनावश्यक मांस जाणीवपूर्वक नदीपात्रात टाकतात. त्यामुळे हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचे षडयंत्र जिहादींकडून सुरू आहे. नदीपात्रात अवैध कत्तलखान्यांतून गोमांसाचे रक्त सोडले जाते. हे दूषित पाणी पुढील गावांतील नागरिक पितात. यावर तत्काळ कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभे केले जाईल.
– कुलदीप ठाकूर (संयोजक-बजरंग दल)
