वाढीव वेळेचा परिणाम तरुणाईच्या उत्साहावर! किरकोळ हाणामार्या; ठाकरे-शिंदे गटाच्या मनोमिलनाची मिरवणूक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तिथीनुसार की तारखेनुसार या वादात शासनाने तारखेनुसारच्या उत्सवाला शिवजन्मोत्सवाची मान्यता देवून दशकाचा काळ लोटला. या कालावधीत दरवर्षी वाद्य वाजवण्याच्या वेळेची मर्यादा आडवी आल्याने चावडी ते शिवस्मारकापर्यंतची मिरवणूक बहुधा मूकच काढावी लागत. यंदा मात्र शिंदे सरकारने तिथीनुसारच्या शिवजयंती उत्सवालाही एकप्रकारे शासन मान्यता देत रात्री 12 वाजेपर्यंत वाद्या वाजवण्यास परवानगी दिली होती. त्याचा परिणाम संगमनेरच्या तरुणाईत स्पष्टपणे बघायला मिळाला. रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेल्या शिवप्रतिमेच्या मिरवणूकीत हजारों तरुण बेधुंद होवून नाचत होते. जय भवानी.. जय शिवाजाचा जयघोषही या दरम्यान सुरु होता.

शुक्रवारी राज्यभर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 394 वी जयंती अलोट उत्साहात साजरी केली गेली. संगमनेरातही मोठ्या कालावधीनंतर या उत्सवाची धूम दिसून आली. पूर्वी केवळ शिवसेना अथवा हिंदुत्त्ववादी गटांची अशी ओळख असलेल्या या शिवजयंती उत्सवात यंदा सर्वपक्षीयांचा समावेश झाल्याचेही दिसून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा जोपासणारा बहुतेक वर्ग तारखेनुसारच्या शिवजयंतीचा पुरस्कर्ता आहे. त्याचा परिपाक या उत्सवातही स्पष्टपणे दिसून यायचा. यावेळी मात्र तो पूर्णतः बदलल्याचे चित्रही बघायला मिळाले. शहरातील चौकाचौकात आणि गल्लोगल्ली महाराष्ट्राच्या जाणता राजाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिवसभर शहरातील विविध भागातून शिवरायांच्या शौर्याचे आणि मराठा फौजांच्या पराक्रमांचे पोवाडे वाजवले जात होते. शिवजयंती उत्सव युवक समितीने हिंदुत्त्ववादी विचारक कालिचरण महाराज यांच्या सहभागातून मोटरसायकल रॅली काढली होती. विठ्ठलनगर परिसरातील रिक्षा चालकांनी स्थापन केलेल्या मंडळाने शिवजयंतीनिमित्त सादर केलेला देखावा लक्षणीय ठरला.

ज्याप्रमाणे सिंहासनाधिश्वर होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक पायरीवर मराठा साम्राज्यासाठी रक्त सांडणार्या आपल्या सख्यांचे स्मरण केले, त्याप्रमाणे विठ्ठलनगर रिक्षा मंडळाने स्वराज्यासाठी खपलेल्या विरांची सलग छायाचित्र लावून त्यांच्या पराक्रमाला उजाळा दिला. वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सतीश आहेर यांनी बसस्थानक चौकात धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्यावतीने उभारलेल्या शिवप्रतिमेवर आकर्षक रोषणाई केली होती. त्यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच गुरुवारी रात्री बसस्थानकाचा परिसर गर्दीने फुलला होता.

सायंकाळी शिवजयंतीची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कोणी काढावी यावरुन सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात काहीसे मतभेद होते. त्यातून दोघांनीही स्वतंत्र अर्ज दिले होते. पोलिसांनी सायंकाळची पारंपरिक मिरवणूक काढण्याची परवानगी ठाकरे गटाला दिली, तर शिंदे गटाला दुपारी मिरवणूक काढण्याची मुभा देण्यात आली. मात्र या दरम्यान शिवसेनेच्या दोन मिरवणुका काढण्याचा नवा पायंडा पडू नये यासाठी काहींनी प्रयत्न केले आणि त्याला यश आले.

शिंदे गटाचे शहराध्यक्ष विकास भरीतकर यांच्या गोविंदमळा परिसरात काहीवेळ त्यांचा चित्ररथ व बॅण्डबाजा वाजल्यानंतर तो तेथून वाजतगाजत येवून नगरपालिकेजवळील ठाकरे गटाच्या मुख्य मिरवणुकीत विसर्जीत झाला. यावेळी शहरप्रमुख अमर कतारी यांनी रथात आरुढ शिवरायांची वेशभूषा केलेल्या तरुणाला औक्षण करुन शिंदेगटाचे मिरवणुकीत स्वागत केले. हा क्षण ठाकरे-शिंदे गटाच्या मनमिलनाचे दर्श घडवणारा होता, मात्र तो किती दीर्घकाळासाठी हे येणार्या घटनांमधूनच समजेल. पुढे तेलीखुंटावर सुदर्शन इटप यांचे मंडळही वाजतगाजत या मिरवणुकीत सहभागी झाल्याने मिरवणुकीची शोभा वाढली.

ठिकाठिकाणी मिरवणुकीचे स्वागत, दोन बॅण्डपथक, मावळचे ढोलपथक असा लवाजामा असलेल्या या मिरवणुकीत हजारो तरुण बेधुंद होवून नाचत होते. खबरदार म्हणून दरवर्षी पोलिसांकडून मिरवणुकीदरम्यान मोमीनपुर्यातील वाहतूक अडथळे निर्माण करुन रोखली जाते. यावर्षी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्याला फाटा देत कोणताही अडथळा निर्माण केला नाही. त्यासोबतच यावर्षी राज्य सरकारने वाद्य वाजवण्यास रात्री 12 वाजेपर्यंत वेळ दिल्याने पोलिसांनी कोठेही मिरवणूक पुढे रेटण्याचा प्रयत्न केला नाही. या दरम्यान उत्साही तरुणांच्या दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल होण्याच्या घटनाही घडला, त्याचा कोणताही परिणाम मिरवणुकीवर झाला नाही. पोलीस दप्तरीही कोणत्याच घटनेची नोंद नाही. रात्री अकराच्या सुमारास शिवरायांची आरती होवून या मिरवणुकीची सांगता झाली.

