संगमनेर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! सख्या चुलत भावानेच केला घात; सतरा वर्षांची अल्पवयीन गरोदर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणानंतर बदललेली परिस्थिती दर्शविणार्या विविध घटना समोर येत असताना आता संगमनेर तालुक्यातून अतिशय धक्कादायक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका वीसवर्षीय तरुणाने आपल्या सख्या चुलत अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार केला. त्यातून अवघ्या सतरा वर्षांची ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून अत्यवस्थ अवस्थेत तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली आहे, त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना शहरातील पूर्वेकडील दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात घडली. या गावात मोलमजुरी करुन राहणार्या दोन कुटुंबातील एका भावाच्या वीसवर्षीय मुलाने सदरचा प्रकार केला आहे. आरोपीने एकत्र कुटुंब पद्धतीने राहणार्या आपल्या परिवारातील अवघ्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीला भुरळ घालून गेल्या सात-साडेसात महिन्यांपासून तो तिच्यावर नियमित अत्याचार करीत आहे. त्यातून सदरची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.

सदरील मुलीचे पोट वाढल्याचे तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला असल्याने पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अत्याचाराच्या कलामांसह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणार्या कायद्याच्या (पोक्सो) विविध कलमान्वये वीसवर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणार्या या घटनेतील आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच अटक केली असून आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. विचारांची गती थांबवणारा हा प्रकार समोर आल्यानंतर तालुका पोलिसही काहीवेळ चक्रावले होते. बहिणीचे रक्षण करण्याची शपथ दरवर्षी रक्षबंधनातून घेण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेला धक्का देवून घडलेल्या या घटनेने कोविडनंतर बदललेल्या मानवी मानसिकतेचे चित्र दाखवणारा आहे. संक्रमणानंतर गुन्हेगारीत झालेली वाढ आणि गेल्या काही कालावधीत समोर आलेल्या अत्यंत क्रूर घटना पाहता अतिशय बोलक्या ठरतील. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल सानप यांच्याकडे देण्यात आला आहे.

