सिन्नर बाजार समितीचे सभापती डॉ. पवारांचे पद रद्द! सोनांबे ग्रामपंचायतमध्ये केलेले अतिक्रमण चांगलेच भोवले


नायक वृत्तसेवा, सिन्नर
येथील बाजार समितीचे सभापती डॉ. रवींद्र रामनाथ पवार यांनी सोनांबे ग्रामपंचायतीमध्ये केलेले अतिक्रमण सिद्ध झाल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपर जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र केले. ग्रामपंचायत गटातून निवडून आलेले डॉ. पवार यांचे बाजार समितीचे सभापतीपद रद्द झाल्याची घोषणा जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांना मिळालेले सभापतीपद रद्द झाल्याने तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यांपूर्वीच बाजार समितीची निवडणूक झाली असून आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाला प्रत्येकी नऊ जागांवर विजय मिळाला होता. कोकाटे गटातील सिंधुबाई केशव कोकाटे या वाजे गटाला येऊन मिळाल्याने सभापतीपदाची माळ डॉ. रवींद्र पवार यांच्या गळ्यात पडली होती. मात्र डॉ. पवार यांनी ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण केल्याचा आरोप गावातीलच शिवाजी भिकाजी पवार यांनी करत अपर जिल्हाधिकार्‍यांकडे पवार यांना अपात्र ठरवण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीत तथ्य आढळल्याने २१ सप्टेंबर २०२३ रोजी अपर जिल्हाधिकार्‍यांनी डॉ. रवींद्र पवार यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता.

या निर्णयामुळे डॉ. पवार यांच्याकडे असलेले सोनांबेचे सरपंचपद रिक्त झाले होते. ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरल्याने ग्रामपंचायत गटातून बाजार समितीवर त्यांची झालेली निवड रद्द करावी, असा अर्ज शिवाजी पवार यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केला होता. डॉ. पवार हे ग्रामपंचायत सदस्य राहिले नसल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास विनियमन) अधिनियम १९६३चे कलम १५ मधील तरतुदीनुसार डॉ. पवार यांचे बाजार समितीचे सदस्यपद रिक्त झाल्याची घोषणा मुलाणी यांनी बुधवारी (ता. २९) केली. अपर जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर डॉ. पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने जिल्हा उपनिबंधकांनी हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, डॉ. पवार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अपील दाखल करण्याबाबत निर्णय दिलेला नाही. डॉ. पवार यांचे सदस्यपद रद्द झाल्याने आणि सभापतीपद गेल्याने वाजे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र बाजार समितीच्या सत्तेत बदल होण्याची शक्यता कमीच आहे. आता वाजे गटाकडे नऊ तर कोकाटे गटाकडे आठ सदस्य राहिले आहेत. त्यामुळे बाजार समितीची सत्ता वाजे गटाकडेच राहणार असून त्यांच्या गटाच्या कोणत्या सदस्याच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 4 Today: 2 Total: 23180

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *