पोलीस शिपायावर कारवाई करा; पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात बातमीसाठी मोबाईल मध्ये शूटिंग घेत असताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत गलिच्छ शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्या पोलीस शिपाई राहुल यादव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी अहिल्यानगर शहर व राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक घार्गे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान पत्रकार अनिल कोळसे यांना कणगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती. त्या संबंधी पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना, संबंधित तक्रारदाराबाबत माहितीचे चित्रीकरण कोळसे मोबाईलवर करत होते.

यावेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने धावत जाऊन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावरही न थांबता त्यांनी गलिच्छ शिवीगाळ व धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात गुंडागर्दी केली.
या वेळी पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला, तरीही यादव यांचा राग कमी न होता ते शिवीगाळ करत राहिले. पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे पत्रकार बांधव आक्रमक झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेऊन निवेदन देत घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत पोलिस नाईक राहुल यादव या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक घार्गे यांनी सदर प्रकरणाची दोन दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पत्रकारांना आश्वासित केले.

यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक झोटिंग, सूर्यकांत नेटके, राजेंद्र उंडे, मनोज साळवे, अनिल कोळसे,आकाश येवले, गोविंद फुणगे, श्रीकांत जाधव, ऋषिकेश राऊत, अबिद शेख, श्रीनिवास सामल, नासिर सय्यद या पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, पिंटू साळवे, निलेश जगधने उपस्थित होते.

Visits: 116 Today: 2 Total: 1108868
