सत्ता असो वा नसो तरीही विकासकामांचा वेग कायम ः थोरात नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर ढोलेवाडी ग्रामपंचायत झाली स्वतंत्र

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सातत्याने विकासकामे करून संगमनेर तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण काम केले आहे. तालुक्यातील जनतेनेही आपल्यावर कायम प्रेम केले असून सत्ता असो वा नसो तरीही तालुक्यातील विकासकामांचा वेग कायम राखला आहे. शहरालगत असलेल्या व नव्याने स्वतंत्र झालेल्या ग्रामपंचायतीमुळे ढोलेवाडीच्या विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वास काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी येथील ढोले लॉन्स येथे नवीन ग्रामपंचायत स्थापनेचा लोकार्पण सोहळा आमदार बाळासाहेब थोरात, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गा तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर इंद्रजीत थोरात, आबासाहेब थोरात, बाबा ओहोळ, बाळासाहेब ढोले, शालिनी ढोले,नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, अभिजीत ढोले, सुधाकर ताजणे, अमोल गुंजाळ, रामनाथ कुर्हे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, गुंजाळवाडी व ढोलेवाडी ग्रामपंचायतसाठी 34 कोटी रुपयांच्या निधीतून पाणी पुरवठा योजना आपण राबवली आहे. यातून या दोन्ही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या आग्रही मागणीनंतर ढोलेवाडी ही ग्रामपंचायत स्वतंत्र केली आहे. शहरालगत असल्याने ढोलेवाडीच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून सर्वांनी आता विकासासाठी एकत्रित अधिक जोमाने काम करावे. गुंजाळवाडी व ढोलेवाडी या परिसरातील नागरिकांनी कायम आपल्यावर मोठे प्रेम केले असून आगामी काळातही सर्वांनी विकासकामांच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना या गावच्या विकासासाठी आपण कामे केली आहेत. ढोलेवाडी हे शहरालगत असल्याने या परिसरारया विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तर रामायणाचार्य रामराव महाराज ढोक म्हणाले, मोठ्या गावातून ढोलेवाडी आता वेगळी झाली आहे. नवीन प्रपंच सुरू झाला आहे. एकीने आणि नेटाने विकासाचे काम करा. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनासाठी संगमनेर तालुका सात्विक विचारांचा असून हा हीच परंपरा यापुढेही नागरिकांनी जपावी असे त्यांनी म्हटले. यावेळी गुंजाळवाडीच्या सरपंच वंदना गुंजाळ, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, भाऊ डाके, बाळासाहेब देशमाने, अरुण ताजणे, गणपत सांगळे, रोहिदास पवार, सुहास आहेर, संतोष हासे, भास्कर गुंजाळ, बाबुराव गुंजाळ आदिंसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे संचालक अभिजीत ढोले यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पवार, शरद बटवाल व पोपट आगलावे यांनी केले तर सुधाकर ताजणे यांनी आभार मानले.
