संगमनेरात बंद असलेली घरं आणि दुकानं चोरट्यांकडून लक्ष्य! मोटार वायडींगचे दुकान फोडले; सत्तर हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक मोटारींची चोरी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय व गुन्हेगारी घटनांसह चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहर व त्या लगतच्या परिसरातील विरळ लोकवस्ती आणि बंद असलेली घरे आणि दुकानांना चोरटे लक्ष्य करीत असल्याचेही चोरीच्या वाढत्या घटनांमधून समोर येत आहे. रविवारी पहाटेही असाच प्रकार संगमनेर खुर्द शिवारातील आडवा ओढा परिसरात घडला असून तेथील सौरभ सोपान रहाणे यांचे इलेक्ट्रिक मोटार वायडिंगचे दुकान फोडून चोरट्यांनी वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या सतरा मोटारींसह स्क्रॅपमधील तांब्याची तार असा एकूण सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला. या घटनेत एक चोरटा सीसीटीव्हीतही कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना काल रविवारी (ता.21) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. चंदनापुरीत राहणार्‍या सौरभ सोपान रहाणे या तरुणाचे संगमनेर खुर्द शिवारातील आडवा ओढा येथे इलेक्ट्रिक मोटार दुरुस्तीचे दुकान आहे. आसपाच्या गावातील शेतकर्‍यांच्या नादुरुस्त झालेल्या मोटारी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असतात. याची माहिती असल्यागत चोरट्यांनी त्याचे दुकान लक्ष्य करुन शटरचे दोन्ही कुलुप तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी ‘त्या’ दुकानाजवळ जाताना काळ्या कापडाने ओळख लपवलेला एक चोरटा लगतच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैदही झाला. मात्र त्यानंतर त्याने सदरील कॅमेर्‍याचे तोंड फिरवल्याने त्यानंतरचा घटनाक्रम आणि चोरट्यांची एकूण संख्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

या घटनेत चोरट्यांनी रहाणे यांच्या साईकृपा इलेक्ट्रिक अ‍ॅण्ड रिपेअरिंग या दुकानातून साडेसात अश्वशक्तीच्या तीन, पाच अश्वशक्तीच्या पाच, बोअरवेलसाठी वापरल्या जाणार्‍या तीन अश्वशक्तीच्या सहा आणि अन्य तीन अश्वशक्तीच्या तीन अशा पोलीस दप्तरी 59 हजार 500 रुपये मूल्याच्या एकूण 17 इलेक्ट्रिक मोटारी व त्यासह 10 हजार रुपये मूल्याची स्क्रॅपमध्ये ठेवलेली तांब्याची तार असा एकूण 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून चोरट्यांनी पोबारा केला आहे. रविवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास रहाणे यांच्या एका मित्राने दुकानाचे शटर उघडे असल्याचे पाहून त्यांना कळविल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस हवालदार अमित महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सदरील घटनेत एकाचवेळी दुकानातून अवजड असलेल्या सतरा मोटारी चोरीला गेल्या. इतक्या मोठ्या संख्येने मोटारी चोरुन नेणं एका चोरट्याचे काम नाही, त्यामुळे या चोरीत एकापेक्षा अधिक चोरट्यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपासही सुरु केला आहे. चोरलेल्या मोटारी वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचाही पोलिसांकडून कसून शोध सुरु असून त्यावेळी अन्य ठिकाणच्या सीसीटीव्हीत आढळलेल्या दोन संशयित वाहनांवर सध्या पोलिसांची नजर खिळली आहे. मागील काही दिवसांत चोरट्यांकडून बंद असलेली घरे व दुकाने लक्ष्य केली जात असल्याचेही समोर आल्याने घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणार्‍यांसह दुकानापासून दूर राहणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सौरभ रहाणे या चंदनापुरीत राहणार्‍या तरुणाने मोठ्या कष्टाने आडवा ओढा येथे मोटार दुरुस्तीचे दुकान टाकले. वाजवी दरात शेतकर्‍यांना तो सेवा देत असल्याने त्याच्याकडे नेहमीच शेतकर्‍यांची वर्दळ असते. या घटनेत त्याच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या सर्व मोटारी आणि तांब्याची तार चोरट्यांनी लांबविल्याने त्याला दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारींची नुकसान भरपाई करुन द्यावी लागणार आहे, त्यामुळे सदरचा तरुण मानसिक दबावात आला असून पोलिसांनी त्याला तोशीस लागणार नाही या दृष्टीने या घटनेचा छडा लावण्याची अपेक्षा चंदनापुरीतून व्यक्त केली जात आहे.

Visits: 428 Today: 1 Total: 1417996

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *