मातृभाषेमुळे मानवी जीवन समृद्ध होते ः डॉ. गायकवाड संगमनेर महाविद्यालयात ‘भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनात प्रत्येक व्यक्तीला मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच भाषेमुळे मानवी जीवन समृद्ध बनते, असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव’ दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. भाषा हे व्यक्तिमत्व विकासाचे अविभाज्य अंग आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या मातृभाषेतच संवाद साधला पाहिजे. ज्ञानार्जनाची भाषा मराठी आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण मातृभाषा म्हणजे आई. आईचा दर्जा भाषेला दिला गेला आहे. मराठी भाषा संपूर्ण जगात बोलली जाते. हे मराठी भाषकांसाठी खूप महत्त्वाचे आहे, असेही प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर, प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. डॉ. बालाजी घारुळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर यांनी केले. आभार डॉ. बालाजी घारुळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश जोर्वेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. राहुल हांडे आणि प्रा. डॉ. शरद थोरात यांनी केले. याप्रसंगी उपस्थित कवींनी विविध विषयावर आपल्या कविता सादर केल्या.