प्रवासी वाहनाची दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी दहा ते बारा भाविक बालंबाल बचावले; घारगाव येथील घटना

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारातील हॉटेल लक्ष्मीजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर चारचाकी वाहन थेट महामार्ग सोडून खड्ड्यात गेले आहे. त्यामुळे वाहनातील दहा ते बारा भाविक बालंबाल बचावले आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी (ता. 14) रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चारचाकी वाहन हे आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने येत होते. रात्री बारा वाजेच्या सुमारास हे वाहन हॉटेल लक्ष्मीजवळ आले असता त्याचवेळी वाहनचालक अचानक हा दुसर्या लेनवर आला. दरम्यान, संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणार्या दुचाकीस जोराची या वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे मोठे वाहन महामार्ग सोडून थेट झाडाझुडपांतील खड्ड्यात गेले. या अपघात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहे तर चारचाकी वाहनातील दहा ते बारा भाविक हे बालंबाल बचावले असल्याचे समजते.

हा अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी पाठविले. अपघातावेळी दुसर्या लेनवर मोठे वाहन असते तर दुर्घटना घडली असती. केवळ दैव बलवत्तर असल्याने वाहनातील सर्वजण बालंबाल बचावले. चारचाकी वाहनातील सर्वजण हे भीमाशंकरला दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून ते पुन्हा माघारी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
